हिंदू नववर्षाचा दिवस- चैत्री पाडवा

gudhi
यंदा चैत्र पाडवा किंवा गुढी पाडवा ६ एप्रिल रोजी साजरा होत असून हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी नवीन संवत्सर विक्रम संवत २०७६ सुरु होईल. हिंदू कॅलेंडर याच दिवसापासून सुरु होते. या कॅलेंडर मध्ये १२ महिने आहेत. चैत्र प्रतिपदा देशात विविध राज्यात विविध प्रकाराने साजरी केली जाते. आणि ती साजरी करण्यामागे निरनिराळे समज आहेत.

navreh
असे मानले जाते कि याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. त्यामुळे याला नवसंवत्सर म्हटले जाते. अन्य एका समजानुसार महान भारतीय गणितज्ञ भास्कराचार्य यांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एक दिवस, महिने, वर्षे मोजून पंचांगाची रचना केली. म्हणूनही हा दिवस महत्वाचा मानला जातो. शालीवाहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. शालिवाहन हा कुंभाराचा मुलगा होता. त्याने शत्रूशी लढण्यासाठी मातीचे सैनिक बनविले आणि त्यांच्यात मंत्रोच्चार करून पाणी शिंपडून, प्राण फुंकून ते जिवंत केले. या सैनिकांनी शत्रूवर विजय मिळविला अशी कथा आहे. या विजयाचे प्रतिक म्हणून विजयपताका म्हणजे गुढी उभारण्याची प्रथा सुरु झाली.

असेही सांगतात याच दिवशी रामाने वानरराजा बाली याच्या अत्याचारी राजवटीतून दाक्षिणात्य लोकांची सुटका केली. त्यानिमित्ताने आनंद साजरा करताना लोकांनी घराघरात गुढी उभारून तो साजरा केला. आंध्र प्रदेशात या दिवशी विशेष प्रकारचा प्रसाद दिला जातो. जो कुणी दिवसभर उपवास करून हा प्रसाद खातो तो निरोगी बनतो आणि त्वचारोगातून त्याला मुक्ती मिळते असा समज आहे.

ugadi
गोवा केरळ आणि कोंकणी भागात हा दिवस पड्वो नावाने साजरा केला जातो कर्नाटकात युगादी नावाने तर आंध्र तेलंगाना मध्ये तो उगाडी नावाने साजरा होतो. काश्मीर मध्ये हा दिवस नवरेह नावाने साजरा केला जातो. हिंदू पंचांगात जे साडेतीन शुभ मुहूर्त मानले जातात त्यात गुढी पाडवा पूर्ण शुभ मुहूर्त आहे. या दिवशी अनेक ठिकाणी नवीन खरेदी, नव्या कामाची सुरवात, गृहप्रवेश अशी शुभ कार्ये केली जातात.

या दिवशी घरासमोर जी गुढी उभारली जाते त्याला काठीवर तांबे अथवा चांदी धातूचा कलश, कापड, गाठी, फुलाचा हार, कडूनिंब आणि आंब्याची डहाळी बांधली जाते. ही गुढी वातावरणातील पॉझीटिव्ह लहरी खेचून घेते आणि त्यामुळे घरात सौख्य शांती येते असाही समज आहे.

Leave a Comment