महाराष्ट्रात एप्रिल मध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे. बॉलीवूड मधील फेमस खान तिकडी म्हणजे सलमान, आमीर आणि शाहरुख जेथे मतदान करतात तो उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ मुंबईतील हाय प्रोफाईल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे या मतदारसंघात कोणत्याच पक्षाचे प्राबल्य नाही कारण येथून जसा भाजप उमेदवार निवडून आला आहे तसेच कॉंग्रेस, शिवसेना आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवारही विजयी झाला आहे. या मतदारसंघातून भाजप तर्फे गतवेळच्या खासदार पूनम महाजन रिंगणात आहेत तर कॉंग्रेसने पुन्हा एकदा सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त हिला उमेदवारी दिली आहे. या दोघींना येथील मतदारानी एकेक वेळा संधी दिली आहे त्यामुळे यंदा कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
हा आहे खान तिकडीचा हायप्रोफाईल मतदारसंघ
६ विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात येतात. बांद्रा पूर्व, पश्चिम, कुर्ला, कालिना, चांदिवली आणि विलेपार्ले असे हे मतदारसंघ आहेत. येथे जसे अनेक सेलेब्रिटी मतदार आहेत तसेच मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीवासीय मतदार आहेत. येथे मराठी मतदारांची संख्या ५.७३ लाख, मुस्लीम ३.५० लाख, हिंदी भाषिक २.३८ लाख, गुजराथी राजस्थानी १.९५ लाख, क्रिश्चन ७३३८७ अशी आहे. विशेष म्हणजे मुंबईतील सर्व मतदारसंघात येथे क्रिश्चन मतदार अधिक आहेत. २०१४ साली येथून पूनम महाजन विजयी झाल्या तसेच २००९ मध्ये प्रिया दत्त, २००४ मध्ये कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड, १९९९ मध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी, १९९८ मध्ये आरपीआयचे रामदास आठवले येथून विजयी झाले आहेत.
या मतदारसंघासाठी २५ कोटी खर्चाची तरतूद असून त्यातील २२ कोटीचा निधी आत्तापर्यंत वापरला गेला आहे. भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी अर्ज भरताना दिलेल्या माहितीनुसार त्यांची मालमत्ता २०१४ मध्ये २३ कोटी होती ती यावेळी १०८ कोटींवर गेली आहे. प्रिया दत्त यांच्यावर येथील मतदार थोडे नाराज आहेत कारण निवडून गेल्यावर त्यांनी येथील जनतेशी संपर्क ठेवला नाही त्यामुळे त्यांना येथे मिसेस नॉट रिचेबल असे म्हटले जाते. मुंबई विमानतळ विकासामुळे प्रभावित झालेली झोपडपट्टी, उंच इमारती बांधण्यावर असलेले निर्बंध, जुहू विमानतळ विकास, बुलेट, मेट्रो रेल आणि मिठी नदी प्रदूषण हे येथील महत्वाचे मुद्दे आहेत.