कुन्घेर, गुजरात येथील ‘चूडैैल माता’ मंदिर

chudail
भारतामध्ये अनेक देवादिकांना, संताना, आणि राक्षसांना देखील समर्पित मंदिरे आहेत, पण भारतातील गुजरात राज्यातील पाटण जिल्ह्यामध्ये कुन्घेर गावामध्ये असलेले मंदिर चक्क ‘चूडैल’, (हडळ)ला समर्पित आहे. या मंदिराला ‘चूडैल माता मंदिर’ या नावाने ओळखले जाते. या मंदिरामध्ये देवीची कुठलीही मूर्ती किंवा प्रतिमा नाही, तर केवळ निरंतर प्रज्वलित असणारी एक तेजस्वी ज्योत आहे. या गावातील हे महत्वाचे देवस्थान आहे, कारण ग्रामस्थांच्या मधील कोणत्याही मतभेदाचे, विवादाचे न्यायनिवाडे गावातील पंचाच्या द्वारे, समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत याच देवीच्या साक्षीने केले जातात. पंचांनी केलेला प्रत्येक निर्णय हा देवीच्या मर्जीने होत असल्याची येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. या मंदिरातील देवीला जरी ‘चूडैल’, म्हणजेच हडळ म्हटले जात असले, तरी या मंदिरामध्ये निरंतर जळणाऱ्या दिवाज्योतीला मात्र आदिशक्ती मानले गेले आहे.
chudail1
या मंदिरातील देवतेवर ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे. कोणती ही अडचण या देवीपुढे मांडली तरी देवी यातून अचूक मार्ग दाखवीत असल्याचा आणि सर्व भाविकांचे मनोरथ देवी पूर्ण करीत असल्याचा विश्वास भाविकांना असल्याने दर रविवारी आणि मंगळवारी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. या मंदिराची स्थापना कशी झाली याबद्दल अनेक आख्यायिका आहेत, याबद्दल एक आख्यायिका अशी, की श्री रायचंददास पटेल नामक एका मनुष्याने अडीचशे वर्षांपूर्वी एका वडाच्या झाडाखाली एक लहानशी देवळी बांधून त्यामध्ये ही ज्योत प्रज्वलित केली होती. त्या ठिकाणी नेमाने पूजा अर्चा केली असता या ज्योतीरूपी देवीच्या कृपेने आपले मनोरथ पूर्ण होत असल्याचा साक्षात्कार अनेक भाविकांना होऊ लागला असल्याने पाहता पाहता येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली. त्यानंतर येथे मोठे मंदिर बांधले जाऊन ही ज्योत आता या मंदिरामध्ये प्रज्वलित आहे.
chudail2
आणखी एका आख्यायिकेनुसार हे मंदिर ज्या ठिकाणी उभे आहे, त्या ठिकाणी पूर्वी एक विहीर होती. एक लहान मुलगी खेळता खेळता पाय घसरून या विहिरीमध्ये पडली आणि तिचा बुडून मृत्यू झाला. त्यावेळी तिथे एक नवविवाहित दाम्पत्य आले असता, या मृत कुमारिकेच्या आत्म्याने त्या नवविवाहित तरुणीच्या शरीरामध्ये प्रवेश केला. तिला पाहून सर्व ग्रामस्थ भयभीत झाले, त्यावेळी तिने, आपण ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे अपाय करण्याच्या उद्देशाने आलो नसून, केवळ मुक्ती मिळविण्याच्या उद्देशाने आलो असल्याचे सांगितले. तिला मुक्ती मिळवून देण्याकरिता ग्रामस्थांनी ज्योत प्रज्वलित केली, आणि ही ज्योत प्रज्वलित होताच त्या कुमारिकेला मुक्ती मिळाली. तीच ज्योत आजही प्रज्वलित असल्याचे म्हटले जात असून, या ज्योतीची ‘चूडैल माता’ म्हणून पूजा होत असते. नववर्षाच्या पहिल्या दिनी या मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.

Leave a Comment