भारताचे आठवे लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांनी १९७१ मधील बांगलादेशच्या युद्धात भारतीय लष्कराचे नेतृत्व केले होते. ‘फिल्ड मार्शल’ हा किताब देऊन माणेकशा यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला होता. ते स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लष्कराचे पहिले फिल्ड मार्शल होते. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘राजी’ फेम दिग्दर्शिका मेघना गुलजार करणार आहे.
आता फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या भूमिकेत दिसणार रणवीर?
अभिनेता रणवीर सिंहकडे मेघनाने या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी विचारणा केली आहे. तर या चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला असणार आहेत. अवघ्या दोन तासांच्या अवधीमध्ये फील्ड मार्शल मानेकशा यांच्यासारख्या पराक्रमी सेना अधिकाऱ्याची कहाणी प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हे अवघड काम असल्याचे मेघना गुलजार म्हणाल्या.
या चित्रपटाच्या पटकथेच्या लेखनाचे सध्या काम सुरु असून, एका व्यक्तीवर आधारित ही कथा असल्याने त्याबद्दल खूप संशोधन करणे आवश्यक असल्याचे मेघना म्हणाल्या. १९७१ सालच्या युद्धाचा काळ या चित्रपटातील काही भागामध्ये दर्शविला जाणार आहे. आपण त्यांच्या परिवारजनांनाही मानेकशा यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी भेटणार असल्याचे मेघना गुलजार म्हणाल्या.