बेगूसराय: सध्या संपूर्ण देशाचे लक्ष बिहारच्या बेगूसराय या लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून बिहारमधील बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून युवा नेता कन्हैया कुमार हा लोकसभा निवडणूक लढणार आहे. कन्हैया कुमारने निवडणूक लढण्यासाठी सर्व जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेचे नाव लोकशाहीसाठी दान करा, कन्हैयाला योगदान द्या असे असून कन्हैया कुमारने ही मोहीम https://www.ourdemocracy.in/Campaign/Kanhaiya या वेबसाईटच्या माध्यमातून सुरु केली आहे.
लोकवर्गणीतून कन्हैया कुमारला आतापर्यंत 56 लाखांची मदत
देशाची लोकशाही आणि संविधान सध्याच्या घडीला धोक्यात आहे. लोकांना मतांसाठी धमकवणे, घाबरवणे यांसारखे सर्व प्रकार सर्रास घडताना दिसत आहेत. दर अर्ध्या तासाला देशात एक शेतकरी आत्महत्या करत आहे. बेसुमार बेरोजगारी गेल्या 45 वर्षात देशात पाहायला मिळत आहे. एकीकडे बेरोजगारी असताना त्याच बेरोजगार तरुणांची डोकी भडकवून हिंदू-मुस्लिम दंगलीसाठी भडकवण्यात येत आहे. या परिस्थितीत देशाचे संविधान आणि लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला पुढे येणे गरजेचे आहे. मी लोकशाही वाचवण्यासाठी झटणाऱ्या सर्वांना आवाहन करु इच्छितो की, सर्व जनतेला मला निवडणूक लढण्यासाठी मदत करावी. तुम्हाला हवी ती रक्कम तुम्ही मला या मोहिमेमार्फत दान करु शकता.
कन्हैयाने अशाप्रकारे सर्व जनतेला लोकशाहीसाठी दान करा, कन्हैयाला योगदान करा असे आवाहन केले आहे. यात कन्हैयाने 70 लाख रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत 4 हजार 445 जणांनी कन्हैया कुमारने केलेल्या या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच कन्हैयाच्या अकाऊंटमध्ये आतापर्यंत 56 लाख 73 हजार 568 रुपये रोख रक्कम जमा झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु झालेल्या या मोहिमेमार्फत 70 लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत. जनतेला यात पैसे जमा करण्यासाठी 24 दिवस शिल्लक आहेत.
महेश्वरी पेरी याचे नाव पैसे जमा करणाऱ्या लोकांमध्ये अग्रस्थानी आहे. कन्हैयाला त्यांनी 5 लाख रुपयांची मदत केली आहे. त्यानंतर कृष्णा मुझुमदार 1 लाख, शिशिर 75 हजार, प्रेम कुमार 51 हजार आणि वेल विशर 50 हजार यांची नावे आहेत. या मोहिमेला देशातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी कन्हैयाला प्रतिसाद देताना ‘तुम्ही विजयी व्हाल’, ‘कन्हैया देशाचे युवा नेतृत्व आहे त्याला योगदान करा अशा कमेंट नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.