फेसबुक जाहिरातींवर नवीन पटनायक आणि अमित शहांनी केले लाखो रुपये खर्च

combo
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचार देखील जोमात होत आहे. व्यक्तिगत गाठीभेटींसोबतच प्रचारासाठी सोशल मीडियाचा देखील प्रभावीपणे वापर केला जात आहे. भाजप आणि समर्थक फेसबुकवर निवडणूक जाहिरातींमध्ये सर्वात अग्रस्थानी आहेत. याबाबतची माहिती फेसबुकच्या एका अहवालामध्येच देण्यात आली आहे. त्या माहितीनुसार एकूण 16,556 जाहिराती फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान देण्यात आल्या. 4.13 कोटींपेक्षा जास्त खर्च यावर करण्यात आला आहे. यापैकी 50 टक्क्यांहून जादाचा खर्च केवळ भाजप आणि समर्थकांनी केल्याचे म्हटले आहे. तर व्यक्तीगत स्वरुपात सर्वाधिक खर्च करण्यामध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा नंबर आहे.

फेसबुकच्या प्लॅटफॉर्मचा निवडणूक काळात वापर सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केला जातो. तसेच अफवाही पसरविल्या जातात. त्यामुळे फेसबुकने अमेरिकेच्या निवडणुकीनंतर कठोर नियम बनवले असून काँग्रेस, भाजपची पेजेस नुकतेच कायमची बंद केली आहेत. पण फेसबुकने जाहिराती करण्यास मनाई केलेली नाही.

निवडणुकीच्या जाहिरातबाजीवर भाजपचे समर्थक फेसबूक पेज “भारत के मन की बात”ने सर्वाधिक पैसे मोजले आहेत. 1.01 कोटी रुपये त्यांनी खर्च केले आहेत. एका महिन्यात 1168 जाहिराती या पेजवरून देण्यात आल्या. 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स या पेजवर आहेत, मोदी सरकारचे काम त्यांना दाखविण्यात आले. तर दुसऱ्या क्रमांकावर “नेशन विद नमो” हे मोदी समर्थकांचे दुसरे पेज असून त्यांनी महिनाभरात 631 जाहिराती दाखविल्या. यासाठी त्यांनी 52.24 लाख रुपये खर्च केले. तर क्षेत्रिय पक्षांनी फेसबुकवर जाहिरातींसाठी 20 लाख रुपये खर्च केले आहेत. यामध्ये काँग्रेस आणि समर्थकांनी केवळ 10 लाख रुपये खर्च केले आहेत.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक फेसबुकवर व्यक्तीगत जाहिराती देण्यामध्ये आघाडीवर आहेत. 4.48 लाख रुपये त्यांनी खर्च केले आहेत. तर 2.08 लाख रुपये खर्च करत भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे आमदार नरेंद्र खीचर, चौथ्या क्रमांकावर भाजपचेच मुरलीधर राव आणि पाचव्या नंबरवर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी आहेत.

Leave a Comment