अखेर दयाबेन ‘तारक मेहता..’मधून बाहेर

disha-vakani
दयाबेन अर्थात दिशा वाकानी सब टिव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून बाहेर पडली आहे. आता निर्माते दयाबेनच्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्रीच्या शोधात आहेत. दिशा सप्टेंबर २०१७ पासून सुट्टीवर आहे. ती मालिकेत प्रसूती रजेनंतर परतणार असल्याचे म्हटले जात होते. तिला ३० दिवसांचा अल्टिमेटमसु्द्धा मालिकेच्या निर्मात्यांनी दिला होता. पण काहीच उत्तर दिशाकडून न आल्याने अखेर दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडीशन सुरू करणार असल्याचे निर्माते असित कुमार मोदी यांनी म्हटले आहे.

यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार प्रसूती रजेनंतर अनेक महिला कामावर परत येतात. दिशाला आम्ही सुट्टी दिली आणि आता तिच्यासाठी आम्ही आणखी वाट पाहू शकत नाही. त्यामुळे आता आम्हाला नव्या दयाबेनचा शोध सुरू करावा लागणार आहे. प्रेक्षक दयाच्या परत येण्याची वाट पाहत आहेत आणि त्यांना आम्ही आणखी फसवू इच्छित नसल्याचे असितकुमार मोदी यांनी म्हटले आहे.

मालिकेच्या निर्मात्यांपुढे याआधी दिशाने परतण्यासाठी काही अटी ठेवल्याची चर्चा होती. यातली पहिली अट म्हणजे, मानधनातील वाढ. मानधनासोबतच दिशाने काम करण्याच्या वेळेतही बदल करण्याची मागणी केली होती. निर्मात्यांनी दिशाची फॅन फॉलोइंग आणि लोकप्रियता पाहता वर्षभराहून अधिक काळ वाट पाहिली. पण यापुढे मालिकेच्या कथानकाची गरज पाहता दिशासाठी आणखी थांबणे योग्य नसल्याचे निर्मात्यांनी म्हटल्यामुळे आता दयाबेनच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागते हे पुढील काळच सांगेल.

Leave a Comment