अखेर शिवसेनेने कापले किरीट सोमय्यांचे तिकीट

kirit-somayya
मुंबई – ईशान्य मुंबईतून खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांनी यंदा देखील त्याच मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी खुप आटापिटा केला, पण शेवटी त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून भाजपने मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिली आहे. निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात झाली असतानाही सोमय्या यांच्या उमेदवारी अर्जाची घोषणा आली नव्हती. तर मनोज कोटक यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आल्यामुळे कोणाला नेमकी उमेदवारी मिळणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण आज अखेर मनोज कोटक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

शिवसेनेची नाराजी किरीट सोमय्या यांना उमेदवारी न मिळण्यामागे असल्याचे सांगितले जात आहे. किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक वक्तव्य केल्यामुळेच किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेना विरोध करत होती. शिवसेनेचा विरोध किरीट सोमय्या यांनी वारंवार प्रयत्न करुनही मावळत नव्हता. मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचाही किरीट सोमय्या यांनी प्रयत्न केला होता. पण भेट नाकारण्यात आल्याने त्यांची निराशा झाली होती.

Leave a Comment