देशात ७ लाख झाडे लावणारे नायर उभारणार पुलवामा शहीद वन

nayar
पृथ्वीवर वृक्ष तोडीचे प्रमाण खूपच वाढल्याने ग्लोबल वॉर्मिंगचे संकट आले असताना नुसते बोलणे आणि उपदेश करणारे जगभरात अनेक आहेत. मात्र न बोलता कृती करून या समस्येवर छोट्या प्रमाणावर का होईना पण काही तरी भरीव कार्य करणारे लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतके तरी असतील कि नाही कोण जाणे. मुळचे केरळचे पण आता अनेक वर्षे गुजराथेत राहत असलेले उद्योजक आर. के नायर यांचे या संदर्भातले काम अवश्य जाणून घ्यायला हवे. नायर यांनी नुकताच पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या नावाने एक जंगल वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्याला पुलवामा शहीद वन असे नाव दिले आहे. येथे ते या शहिदांची स्मृती म्हणून ४० विविध प्रकारची ४० हजार झाडे वाढविणार आहेत.

pulvama
नायर यांनी यापूर्वी सात राज्यात ६ लाख झाडे लावून ती जोपासली आहेत. याचाच अर्थ त्यांनी सात राज्यात ४० जंगले वाढविली आहेत. महाराष्ट्रात केमिकल डम्पयार्ड मध्ये त्यांनी २०१६ साली त्यांच्या टीमच्या मदतीने ३८ प्रकारची ३२ हजार झाडे वाढवून या भागाचा कायापालट केला आहे. त्याचबरोबर छत्तीसगड, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान अश्या राज्यातही वृक्षारोपण करून हिरवाई निर्माण केली आहे.

nayartree
नायर मुळचे केरळचे. चार वर्षाचे असताना ते मंगळूरमध्ये आले तेथेच त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. बारावी पास होता आले नाही तेव्हा नोकरीच्या शोधात ते मुंबईत आले आणि मेडिकल, कपडे अश्या दुकानांतून नोकरी केली. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून स्वतःची कंपनी गुजराथ मध्ये सुरु केली. नायर यांना पहिल्यापासून झाडांचे अतोनात प्रेम. गुजरात मध्ये रस्ता तयार होत असताना १७५ झाडे कापली गेली आणि त्यावरची पक्ष्यांची घरटी मोडली गेली. तेव्हाच नायर यांना आपण काहीतरी वेगळे करायला हवे याची जाणीव झाली आणि त्यांनी त्याच्या मित्रासह एक जमीन विकत घेऊन तेथे झाडे लावली. अकोरा मियाकाकी या जपानी पद्धतीचा त्यांनी त्यासाठी वापर केला. त्यासाठी जपानी टीमशी संपर्क केला आणि सुरवातीला १५०० झाडे लावली. तेथून त्याच्या कामाची व्याप्ती वाढत गेली आणि त्यांनी देशातील ७ राज्यात आत्तापर्यंत ६ लाख झाडे जोपासली आहेत. त्यासाठी त्यांनी एक टीम तयार केली असून हे मंडळी जागोजागी झाडे लावण्याचे पुण्यकर्म करत आहेत.

Leave a Comment