जोहारचे नमाज सुरु झाल्याने उदयनराजेंनी थांबवले भाषण

udyanraje-Bhosale
सातारा: आज शक्तीप्रदर्शन करत सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

याच दरम्यान उदयनराजे भोसले यांचे भाषण सुरु झाले पण नेमके त्याचवेळी जोहारचे नमाज सुरु झाल्याने उदयनराजेंनी आपले भाषण थांबवले. पण नमाज झाल्यानंतर त्यांनी जोरदार बँटिंग केली. ज्यांना पाच वर्षपूर्वी बहुमत दिले, मन की बात करुन त्यांनी अभिनय केला. पण आपल्या पदरात काहीच पडले नाही, दिशाभूल केली, असा आरोप उदयनराजेंनी मोदींवर केला. बहुमत मिळाल्यावर विसर पडला. तळागाळातील जनता आणखी गाळात गेली. 15 लाख मिळाले नाहीत. पण नोटबंदीत पैसे काढून घेतले. अडीच कोटी नोकरी दिली नाही. पण बेरोजगार झाले, असे टोमणे उदयनराजेंननी लगावले.

या सरकारने आपल्याला भिकेला लावले, आपण आता विचार केला पाहिजे, पाच वर्षात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतकरी राजा असून आता जन की बात सुनावली पाहिजे. ब्रिटिश ईस्ट कंपनीसारखे छाटछूट कंपन्यांनी राज्य केले. लोकशाही नावापुरती असून हुकूमशाही सुरु आहे. अधिकार ठराविक उद्योगपतींना दिले. ईस्ट इंडिया कंपनीसारखी बिजनेस कंपनी निर्माण केली, देशापेक्षा उद्योजक मोठा कसा? उद्योजक उद्या नद्या विकतील, मग त्यांच्याकडून पाणी विकत घ्यायचे का, असा सवाल उदयनराजेंनी विचारला.

काही लोक यादरम्यान हसत होते, शिट्ट्या वाजवत होते, त्यावेळी हसू नका, शिट्या वाजवायला काय झाले, असे म्हणत उदयनराजेंनी उत्साही कार्यकर्त्यांना झापले. आता सत्तांतराशिवाय गत्यंतर नाही, नाहीतर रशिया सारखे तुकडे होतील, असे उदयनराजे म्हणाले. याचदरम्यान लाईट गेल्याने उदयनराजेंनी माईक सोडून भाषण केले.

सध्या अहंकार माजला आहे. ठीक आहे, पाहून घेऊ अशी भाषा ते करतात. पण असे सरकार उलथून टाकल्याशिवाय राहायचे नाही, सरकार गेले नाही तर सोमालिया होईल, कायदा कानून नाही. बलात्कार, खून होतो आहे, ही अवस्था आपली होईल, असे उदयनराजे म्हणाले.

Leave a Comment