तामिळनाडू: आपल्या देशात अवघ्या काही दिवसात 17व्या लोकसभेच्या निवडणुकींना सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये येत्या 11 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत देशाचे नेतृत्व करणाऱ्या तरुण पिढीने मतदान करावे, असे आवाहन विविध क्षेत्रातील दिग्गज करत आहेत. तामिळनाडूतील एका व्यक्तीने या पार्श्वभूमीवर चक्क सोने-चांदीचा वापर करत ईव्हीएम मशीनची प्रतिकृती साकारली आहे.
हे अनोखे ईव्हीएम मशीन तमिळनाडूच्या कोयंबद्दूरमध्ये राहणाऱ्या राजा नावाच्या व्यक्तीने तयार केले आहे. राजाने हे मशीन तयार करण्यासाठी 1 ग्रॅम चांदी आणि 300 मिलीग्रॅम सोने वापरले आहे. या ईव्हीएम मशीनमध्ये त्याने 18 पक्षांच्या निवडणूक चिन्हांची प्रतिकृती बनवली आहे. त्याशिवाय कर्कटक आणि पेन्सिलचा वापर करत त्याने एक अनोख चित्र साकारले आहे. यात पेन्सिलच्या सहाय्याने त्याने एक माणूस तयार केला आहे. याचा एक हात वर दाखवून तरुणांना मतदान करा, असे आवाहन करणार चित्र त्याने साकारले आहे.
कोयंबद्दूर शहरातील एका कलाकाराने याआधीही महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, अब्दुल कलाम यांसारख्या महान नेत्यांच्या आकृत्या मेणबत्तीवर साकारल्या होत्या. या व्यक्तीने त्याच्याप्रमाणे अशाप्रकारे सोने-चांदीची प्रतिकृती साकरत हा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. राजा हा एक सामाजिक कार्यकर्ता असून याआधी त्याने जल्लीकट्टूच्या मुद्द्यावर एका बैलाचे चित्र रेखाटले होते.