एका चोराच्या अजब तऱ्हेमुळे मध्यप्रदेशच्या भोपाळमधील बागसेवनिया भागातील नागरिक फार वैतागले आहे. आता तुम्ही म्हणत असाल की हा चोर कोणतीही मौल्यवान वस्तुंची चोरी न करता एका वेगळ्या वस्तुंची चोरी करतो. हा चोर बादली, मग, जेवण, बूट आणि सिम कार्ड यांसारख्या गोष्टी चोरतो. कॉलनीमधील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये या चोराचे फोटो कैद झाले असल्यामुळे त्याला पकडण्यासाठी बागसेवनिया पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
चोराची अजब तऱ्हा; चोरतो बादली आणि मग, पळून जातो आंघोळ करुन
बागसेवनियामधील रहिवाशी असलेल्या तक्रारकर्त्या रश्मी यांनी सांगितले की, त्यांच्या बाथरूमधून चोराने बादली, मग आणि साबण चोरल्यानंतर त्याने टॅरेसवर जाऊन टाकीतून पाणी काढून आंघोळ केली आणि जुने कपडे तिथेच ठेवून नवीन कपडे घालून निघून गेला. या चोराबाबत रश्मीच्या शेजाऱ्यांनीही तक्रार नोंदवली आहे. त्यांनी असे सांगितले की, जेव्हा घरी सगळे झोपले होते. चोराने तेव्हा खिडकीच्या ग्रीलमधून हात आतमध्ये टाकून दरवाजा उघडला. तो त्यानंतर घरामध्ये आला आणि फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ घेतले आणि टॅरेसवर बसून ते सर्व पदार्थ खाऊन उरलेले पदार्थ तसेच ठेवून तिथून निघून गेला.
या चोराने साकेत नगरमध्ये दहापेक्षा जास्त घरात जाऊन चोरी केली आहे. येथे राहणाऱ्या मुकेश यांनी सांगितले की, त्यांच्या घरातून चोर कपडे चोरून निघून गेला. कपड्यांजवळ मोबाईल होता. परंतु त्याने मोबाईल न चोरता फक्त सिम कार्ड घेतले आणि तिथून पसार झाला. त्याचबरोबर या विचित्र चोराने एका ठिकाणाहून नवीन बूट चोरले आणि जुन्या चपला तिथेच ठेवून गेला. आतापर्यंत याने दहापेक्षा जास्त चोऱ्या केल्या असून सर्व चोऱ्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाल्या आहेत.