आनंदी जोडप्याच्या समाधानी दाम्पत्यजीवनाचे रहस्य


कोणतेही नाते जपणे, आणि वाढविणे हे खरेतर मोठे जोखमीचे काम आहे. त्यातून पती-पत्नीचे नाते तर अतिशय खास आहे. पती-पत्नी म्हणून एखादे दाम्पत्य ‘परफेक्ट’ असेल ही, पण हे नाते कायम परफेक्ट राहावे असे वाटत असेल, तर पती आणि पत्नी दोघांनीही यासाठी प्रयत्न करणे अगत्याचे असते. टाळी जशी दोन्ही हातांनी वाजते, तसे पती आणि पत्नी या दोहोंच्या समजूतदारपणावर संसाराचा गाडा सुरळीत चालणे अवलंबून असते. त्यामुळे दाम्पत्यजीवन सुरळीत चालावे या करिता काही गोष्टींचा विचार करणे अगत्याचे आहे.

परस्परांवरील प्रेमाचा, विश्वासाचा आपल्या संभाषणामधून उल्लेख करा. मनातले प्रेम, सहानुभूती बोलून दाखविली गेली नाही, तर दुसऱ्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आपल्या भावना एकमेकांसमोर मनमोकळेपणाने व्यक्त करा.

जरी एक दुसऱ्याविषयी कळत नकळत थट्टा केली गेली तर त्याबद्दल मनामध्ये राग न धरता, परिस्थिती समजून घ्या. अनेकदा पती किंवा पत्नी आपल्या जोडीदाराच्या एखाद्या सवयीविषयी किंवा त्याच्या बाबतीत घडलेल्या एखाद्या घटनेविषयी गमतीने चारचौघात बोलून जातात. अश्या वेळी ही थट्टा समजून घ्यावी. तसेच जशी एकमेकांची थट्टा केली जाते, तसेच एकमेकांच्या गुणांचे कौतुकही आवर्जून करा. आपल्या जोडीदाराने केलेले कुठले उत्तम काम किंवा त्याच्या मध्ये असणारी एखादी कला याचे चारचौघात केलेले कौतुक, जोडीदारासाठी फार महत्वाचे असते. तसेच या कौतुकातून पती किंवा पत्नीला प्रोत्साहन मिळत असते.

संसार म्हटला, की यामध्ये दोघांच्याही जबाबदाऱ्या आल्या. त्यामुळे घर, मुले, आर्थिक जबाबदारी, कौटुंबिक जबाबदाऱ्या या विषयीचे सर्व निर्णय एकमेकांच्या सल्ल्याने घ्यावयास हवेत. एकमेकांची मते विचारात घ्या आणि जर मते पटत नसतील तर त्यासाठी कारणे पटवून द्या. प्रत्येक गोष्टीचे प्लॅनिंग करणे आवश्यक असले, तरी क्वचित प्रसंगी काही कारणांमुळे आपण केलेल्या योजनांमध्ये बदल करावे लागतात. अश्यावेळी बदल स्वीकारण्याची तयारी ठेवावी.

जर काही कारणांने कोणत्याही प्रकारची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली, तर परिस्थिती लक्षात घेऊन जोडीदाराला मानसिक आधार द्या. कित्येकदा पती किंवा पत्नी ऑफिसमधील कामाच्या व्यापाने किंवा घरामधील काही अडचणींमुळे त्रस्त असतात. अश्या वेळी आपल्या जोडीदाराच्या मनस्थितीबाबत संवेदनशील रहावे. त्याची जर काही कारणाने चिडचिड होत असेल, त्याची मनस्थिती समजून घ्या. जोडीदाराचा राग तुमच्यावर आहे असे समजून आपली मनस्थिती बिघडू देऊ नये.

समजूतदार पती पत्नींना आपले मत कधी, कसे मांडायचे हे नेमके समजते. पती किंवा पत्नी एखादा मुद्दा मांडीत असताना त्यांच्या बोलण्यामध्ये व्यत्यय न आणता जोडीदाराला त्याचे मत पूर्णपणे मांडू द्यावे. त्याचे विचार पूर्णपणे ऐकून घेऊन मगच दुसऱ्या जोडीदाराने आपले विचार मांडावेत.

पती पत्नी जसा आपला वेळ मुलांसाठी देत असतात, तसाच तो एकमेकांसाठी देणे ही आवश्यक आहे. त्यासाठी कुठे तरी फिरायलाच जायला हवे असे नाही. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये ऑफिसमधून घरी आल्यानंतर परत फिरायला बाहेर पडण्याचा विचारच करता येत नाही. पण एकत्र चहा घेताना देखील दिवसभरातील घडामोडींबद्दल गप्पा रंगू शकतात. पत्नी जर स्वयंपाक घरामध्ये जेवणाची तयारी करत असली, तरी तिथे बसून तिला मदत करीत तिच्याशी गप्पा मारल्यात तर तिला ही कंपनी मिळेल आणि गप्पाही होतील.

Leave a Comment