केरळ हे भारतातील निसर्गाचा वरदहस्त असलेले राज्य. येथील पर्यटन स्थळे देश विदेशातील पर्यटकांना आकर्षून घेत असतात. मात्र फारसे प्रसिद्ध नसलेले आणि आता कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी निवडलेले वायनाड केवळ भारतातच नाही तर परदेशातही चर्चेत आले आहे. राहुल गांधी यांनी निवडलेले वायनाड आहे तरी कसे याचा शोध घेतला तर दिसेल की केरळ मधील हे अतिशय सुंदर, नयनरम्य ठिकाण आहे. चारी बाजूनी हिरवेगार जंगल, अनेक जातीचे पशु पक्षी आणि वेगळी संस्कृती यामुळे हे ठिकाण भटकंतीप्रिय लोकांसाठी खास बनू शकते. वायनाडला गेलात तर ही स्थळे पाहायला विसरू नका.
केरळ मधील वायनाड आहे तरी कसे?
चेम्ब्रा पीक हे समुद्रसपाटीपासून २१०० फुट उंचावरचे ठिकाण खूपच सुंदर असून धकाधकी करून दमला असाल तर शांततेत काही वेळ घालविण्यास सर्वस्वी योग्य आहे. नीलिमाला हे वायनाडच्या दक्षिणेकडचे ठिकाण ट्रेकिंग प्रेमीसाठी खास आकर्षण ठरू शकते. येथून चढून सर्वात वरचे टोक गाठले कि मीनमुट्टी धबधबा दिसेल. त्याचे सौंदर्य डोळेभरून पाहू शकता.
लाईफटाइम एकस्पिरीयंस घ्यायचा असेल तर जवळच असलेल्या कुरुवा बेटावर जायलाच हवे. कानिबी नदीच्या त्रिभुज प्रदेशात अनेक छोटी बेटे असून तेथे विविध प्रकारचे पक्षी, फुले, वनौषधी, दुर्लभ बांबू बेटे पाहायला मिळतात. येथे जगभरातून रिव्हर राफ्टींग करण्यासाठी हौशी लोक येतात. चारी बाजूनी हिरवे डोंगर, नद्या, सरोवरे, ओढे नाले यांनी हा परिसर सजलेला आहे. साहसाचा अनुभव हवा असेल तर अनोथ, मनमथावडी ला जावे. राफ्टींगची हौस भागवायला वेगवेगळ्या लेव्हल असलेले बनसुरा धरण गाठावे. हे बोटिंग साठी अतिशय प्रसिद्ध असून ते जगातील सर्वात मोठ्या धरणापैकी एक आहे. येथे पॅडल बोटी, स्पीड बोटी मिळतात.
येथील वन्यप्राणी अभयारण्य पर्यटकांच्या लिस्ट मध्ये असतेच. हे हत्ती अभयारण्य आहे आणि ३४५ किमी परिसरात पसरलेले आहे. अस्वले, मोर, बिबटे, हरणे, माकडे असे विविध प्राणी येथे पाहता येतात. ऑक्टोबर ते मे हा येथे भेट देण्यासाठी चांगला सिझन आहे.