मुंबई : विजया बँक आणि देना बँक या दोन सरकारी बँकांचे आज बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण झाले असून बँक ऑफ बडोदा या दोन बँकांच्या विलीनीकरणाबरोबर देशातील तिसरी सर्वात मोठी बँक झाली आहे. विजया बँक आणि देना बँक यांच्या सर्व शाखा आजपासून बँक ऑफ बडोदाच्या शाखा म्हणून काम करणार आहेत. त्यापुर्वी विजया बँक आणि देना बँकेच्या ग्राहकांना काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे.
आजपासून बदलली ‘या’ सरकारी बँकांची नावे
या बँकांच्या विलिनीकरणानंतर ग्राहकांना ही कामे आवर्जुन करावी लागणार आहेत. या विलीनीकरणानंतर विजया आणि देना बँकांच्या ग्राहकांना अकाऊंट नंबर बदलावा लागेल. अकाऊंट नंबर बदलल्यामुळे सर्व ग्राहकांना पासबुक आणि चेकबुकही बदलावे लागेल. दोन्ही बँकांच्या सर्व ग्राहकांना नवे डेबिट आणि एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड घ्यायला लागेल. बँकांचं नाव बदलल्यामुळे ग्राहकांच्या शाखांचा IFSC कोडही बदलणार आहे. SIP किंवा लोन EMIसाठी ग्राहकांना नवा इन्स्ट्रक्शन फाॅर्म भरावा लागेल. बँकांच्या काही शाखा बंद होणार. त्यामुळे ग्राहकांना नव्या शाखांमध्ये जावे लागणार आहे.
या विलीनीकरणानंतर हा एकत्रित कारभार 14.82 लाख कोटी झाला आहे. बँक ऑफ बडोदा भारतीय स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेनंतर देशातली तिसरी मोठी बँक झाली आहे. आता सरकारी बँकांची संख्या कमी होऊन ती 18 झाली आहे. 1 एप्रिलपासून बँकेतून लोन घेणे स्वस्त होणार आहे. तुम्ही घेतलेल्या कर्जावर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार रेपो रेट लावला जाणार आहे. रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट घटल्यास व्याजदरातही कपात होणार आहे. व्याजदर वाढवणे किंवा कमी करणे आता बँकेच्या हातात राहणार नाही. बँकेच्या व्याजदरांवर रिझर्व्ह बँकेची नजर राहणार आहे.