जाणून घ्या कसोटी क्रिकेटच्या नियमांमध्ये आयसीसीने केलेले बदल

test
क्रिकेटप्रेमींना झटपट क्रिकेटच्या जमान्यात कसोटी क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी आयसीसीने कसोटी क्रिकेटच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात नाणेफेक, चौकार-षटकार, नो-वाइड बॉल आणि बाद करण्याच्या पद्धतीत बदल करण्यात येणार आहे.

कसोटीच्या नियमात बदल व्हावेत अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात आली होती. हे नवे नियम टेस्ट चॅम्पियनशिपपासून लागू होतील. नव्या नियमांनुसार कसोटी खेळणाऱ्या खेळाडूच्या किटवर त्याच्या नंबरशिवाय चक्क इन्स्टाग्राम आयडी असेल. तसेच दोन खेळाडू एका चेंडूवर बाद करता येणार आहे. एक खेळाडू झेलबाद झाला तर दुसऱ्या खेळाडूला धावबाद करता येणार आहे. फॉल्ट्स आणि एसेज हे दोन शब्द वाईड आणि नो बॉलच्या ऐवजी वापरले जातील. डे-नाइट कसोटीमध्ये दुप्पट धावा मिळतील. चौकार मारल्यास आठ आणि षटकार मारल्यास 12 धावा दिल्या जाणार आहेत.

त्याचबरोबर आता कसोटीत नाणेफेक नाही तर ट्विटर पोल घेतला जाणार असल्याचे आयसीसीने म्हटले आहे. पोलच्या माध्यमातून कोण पहिल्यांदा फलंदाजी करणार आणि कोण गोलंदाजी हे ठरवले जाणार आहे. खेळाडूंना उन्हाळ्याच्या दिवसात खेळताना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. आता खेळाडूंना त्यासाठी शॉर्ट कपडे घालण्याची मुभा असेल.

तसेच आतापर्यंत कॉमेंटेटर स्टेडियममध्ये एका बॉक्समध्ये किंवा स्टुडिओतून कॉमेंट्री करायचे. पण त्यांना आता फिल्डर्सच्या मागे उभे राहून मैदानावरून थेट कॉमेंट्री करता येणार आहे. आयसीसीच्या या नियमांमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असतील. विशेष म्हणजे आयसीसीने ट्विटरवरून हे नियम घोषित केले आहेत. पण ते लोकांना एप्रिल फूल करण्यासाठी आहे. प्रत्यक्षात कसोटीत असे कोणतेच बदल केले जाणार नाहीत.

Leave a Comment