अंनिस निवडणुकांचे अचुक निकाल सांगणाऱ्या ज्योतिषाला देणार 21 लाखांचे इनाम

anis
सांगली – अंधश्रद्धा निर्मुलन समितीने निवडणुकांचे अचूक निकाल सांगणाऱ्या ज्योतिषाला 21 लाखांचे इनाम घोषित केले असल्याची माहिती समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ज्योतिषशास्त्र हे शुद्ध फसवणूक असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने २०१४ च्या निवडणुकीत देखील देशभरातील ज्योतिषांना अचूक उत्तरासाठी २१ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. पण ते आवाहन कोणत्याही ज्योतिष्याने स्वीकारले नसल्यामुळे २०१९च्या निवडणुकीतही भाकीत तंतोतंत सांगणाऱ्या ज्योतिषांना हे आव्हान देत असल्याची माहिती ‘अंनिस’चे राज्य कार्यवाह डॉ. नितीन शिंदे, प्रा. प. रा. आर्डे, डॉ. संजय निटवे, राहुल थोरात यांनी दिली.

ते सांगलीतील ज्योतिष संमेलना संदर्भात बोलत होते. आमची ज्योतिष संमेलनाला आव्हान देण्याची तयारी होती. पुण्यात गतवेळी ज्योतिषांची पोलखोल केल्यानंतर ते हतबल झाले. आमच्यासमोर त्यांनी सपशेल नांगी टाकली. पृथ्वीवरील मानवी जीवनावर अवकाशात लाखो किलोमीटर दूर असलेले ग्रह हे परिणाम करतात या चुकीच्या पायावर ज्योतिष सांगितले जाते. त्यांचा पायाच चुकीचा आहे. फलज्योतिषाच्या भाकीताला कोणताही आधार नसल्याचा मसुदा जगातील १८६ नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी १९७५ मध्ये बनवला आहे. फोलपणाबद्दल पुरावे दिले. तरीही ज्योतिषांकडून जनमानसाच्या असहायतेचा फायदा घेतला जात आहे.

पुढे ते म्हणाले, देशभरातील सर्व ज्योतिषांना २०१४ च्या निवडणुकीत अचूक भाकीत वर्तवण्यासाठी आव्हान दिले होते. शंभर टक्के नाही कमी प्रमाणात देखील उत्तर दिल्यास २१ लाखांचे बक्षीस जाहीर केले. पण ते ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार आणि इतरांनी स्वीकारले नाही. आम्ही या निवडणुकीतही आव्हान देत आहोत. ज्योतिषी मानवी स्वभावाचा फायदा घेतात. ते विज्ञानाच्या कसोटीवर शास्त्र टिकत नाही. ग्रहताऱ्यांविषयी परिपूर्ण माहिती सहावी-सातवीच्या पाठ्यपुस्तकात आहे. विद्यार्थ्यांना खोलवर व प्रत्यक्षात त्याची माहिती देण्याची गरज आहे.

Leave a Comment