५ जी सेवा देण्यात चीनची मुसंडी, शांघाई मध्ये ५ जी सुरु

shanghai
जगभरात फाईव्ह जी इंटरनेट सेवा सुरु होण्याची प्रतीक्षा सुरु आहे आणि त्यासाठी अनेक इंटरनेट कंपन्या चाचण्या घेत असतानाच चीनने अमेरिकेला मागे टाकत टेक्नोलॉजी क्षेत्रात अग्रणी देश बनण्याचा पराक्रम केला आहे. चीनी सरकारी वृतपत्र चायना डेलीने शांघाई जिल्ह्यात फाईव्ह जी कव्हरेज तसेच गिगाबाईट नेटवर्क सुरु झाल्याचे जाहीर केले असून हे कामगिरी करणारा चीन पहिला देश असल्याचा दावा केला आहे. फाईव्ह जी सेवा जगात सर्वप्रथम कुठल्या देशात सुरु होणार याचे अनेक तर्क वितर्क गेले काही दिवस लढविले जात होते त्यामुळे आता त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

फाईव्ह जी हे नेक्स्ट जनरेशन सेल्युलर तंत्रज्ञान असून त्याचा वेग फोर जी पेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. हे तंत्रज्ञान सर्वात अगोदर आपल्या देशात सुरु व्हावे यासाठी चीनसह अमेरिका, फिनलंड, नेदरलँड्स या देशात स्पर्धा होती. चीनने फाईव्ह जी टेस्टिंग साठी चीनी सरकारी दूरसंचार कंपनी चायना मोबाईलचे सहकार्य घेतले गेल्याचे जाहीर केले आहे.

शनिवारी शांघाईच्या होंगकोउ येथे या नेटवर्कची सुरवात उपमहापौर वु क्विंग यांनी पहिला फाईव्ह जी व्हिडीओ कॉल लावून केली. हा एक अद्भुत अनुभव होता असे वू म्हणाले. गेले तीन महिने येथे फाईव्ह जी बेस स्टेशन उभारण्याचे काम केले जात होते. युजर सिमकार्ड न बदलता या सेवेचा फायदा घेऊ शकणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे एखादा चित्रपट अथवा व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी लागणारा वेळ काही मिनिटांवरून सेकांदांवर येतो इतका त्याचा वेग आहे.

Leave a Comment