जेफ बेजोस यांचा मोबाईल हॅक करण्यात सौदीचा हात

bejos
अमेझोनचे सर्वेसर्वा आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांचा खासगी डेटा मोबाईल हॅक करून मिळविला गेला आणि त्यात सौदीचा हात होता असा निष्कर्ष जेफ यांनी या प्रकरणी तपास सोपविलेल्या खासगी तपासगाराने काढला आहे. जेफ यांनी या तपास गोविन डी बेकर यांच्याकडे सोपविला होता. बेकर याच्या अहवालानुसार जेफ यांचे खासगी संदेश आणि काही खासगी फोटो नॅशनल एक्वायर या टॅब्लॉईड मध्ये प्रसिद्ध झाले आणि ही माहिती सौर्दी अरेबियाकडून हॅक केली गेली. बेजोस यांना त्यांची गुप्त माहिती प्रसिद्ध केली जाण्याची धमकी दिली जात होती. या सर्व प्रकारचा संबंध वॉशिंग्टन पोस्ट वर्तमानपत्राशी असल्याचे बेकर यांचे म्हणणे आहे.

वॉशिंग्टन पोस्ट या पेपरची मालकी जेफ बेजोस यांच्याकडे आहे. या पेपरने सौदी पत्रकार जमाल खाशोगी यांची तुर्कास्तानांतील सौदी वाणिज्य दुतावासात क्रूर हत्या झाल्याचे प्रकरण लावून धरले होते आणि या हत्येत सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान याचा हात असल्याचे म्हणणे मांडले होते. गेल्या वर्षी २ ऑक्टोबरला जमाल यांची हत्या करण्यात आली होती मात्र सहा महिने उलटूनही या हत्येची जबाबदारी कुणी घेतलेली नाही. सौदीने फक्त त्यांच्या दुतावासात हत्या झाली अशी कबुली दिली आहे.

फेब्रुवारी मध्ये बेजोस यांनी स्वत नॅशनल एक्वायरची मालकी असलेली अमेरिकन मिडिया इंकवर त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचे आरोप केले होते. नॅशनल एक्वायरने जानेवारी महिन्यात अमेझोनचे प्रमुख जेफ बेजोस यांचे अफेअर सुरु असल्याचे वृत्त दिले होते. त्यांचे काही खासगी फोटो आणि संदेशही प्रसिद्ध केले गेले होते. त्यावर तपास करताना बेकर यांनी सौदीने सातत्याने वॉशिंग्टन पोस्टला निशाणा बनविल्याचे नजरेस आणून दिले आहे. यामागे जामाल खाशोगी हत्या प्रकरण आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

अर्थात बेकर यांनी सादर केलेल्या तपास अहवालावर अमेरिकन इंकने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र जेफ यांच्यासंदर्भातली माहिती प्रसिद्ध करताना त्यांनी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही असे म्हटले आहे. तर बेकर यांनी जेफ बेजोस मोबाईल हॅक प्रकारांचा तपास अमेरिकन अधिकाऱ्यांना देताना हा तपास पूर्ण इमानदारीने केल्याचे डेली बीस्ट वेबसाईटवर नमूद केले आहे.

Leave a Comment