हे आहे जगातील सर्वात लहान वाळवंट


पृथ्वीवर एकूण एक तृतीयांश भागामध्ये वाळवंटांचा विस्तार आहे. सहारा किंवा रुब अल खली या विस्तीर्ण वाळवंटांबद्दल आपण नक्कीच ऐकले असेल. अनेकांनी सौदी अरेबिया, मिस्र, मंगोलिया, नामिबिया, मोरक्को, इत्यादी देशांना भेटी देऊन तेथील वाळवंटामध्ये फेरफटकाही मारला असेल, तर अनेकांनी राजस्थानमधील थार वाळवंटाचे दर्शन घेतले असेल. पण जगामध्ये असे ही एक वाळवंट अस्तित्वात आहे, जे सर्वात लहान म्हणून ओळखले जाते. कॅनडा येथील युकॉन प्रांतामध्ये असलेले कारक्रॉस डेझर्ट जगातील सर्वात लहान वाळवंट आहे. केवळ एक वर्गमैल इतकाच या वाळवंटाचा विस्तार आहे. या वाळवंटाच्या जवळच असलेल्या कारक्रॉस गावाची जनसंख्या अवघी तीनशे आहे.

कारक्रॉस डेझर्ट हे काहीसे स्तिमित करणारे ठिकाण आहे, अस येथील स्थानिक रहिवासी म्हणतात. येथे असणाऱ्या क्रॉस नदीच्या किनारी अनेक दुर्लभ वनस्पती सापडतात, पण या विषयी बाहेरील लोकांना फारशी माहिती नाही. हे वाळवंट समुद्रसपाटीपासून पुष्कळ उंचीवर असून, या ठिकाणी अनेक शतकांपूर्वी भटक्या जमातींचे वास्तव्य असे. सुमारे चार हजार वर्षांपूर्वीपासून येथे बेनेट आणि नारेस नामक दोन तलाव असून, यांचा संगम येथे होत असे. या संगमावर एक पूलही बांधला गेला होता. म्हणून या ठिकाणाचे नाव कारक्रॉस पडले असल्याची आख्यायिका आहे. पूल बांधला गेल्यानंतर कारिबू नामक जमातीचे लोक येथे येऊन राहिले. त्यानंतरही अनेक भटक्या जमातीचे लोक येथे रहात असत.

आता कारक्रॉस गावामध्ये प्राचीन कालीन एक चर्च, एक किराणामालाचे दुकान आणि काही केबिन्स आजही उभ्या आहेत. पण आज येथील स्थिती खूपच वेगळी आहे. आता हे वाळवंट ‘अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स’ करिता विकसित केले गेले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक बाईक प्रेमी, आपली बाईक रायडींगची हौस पूर्ण करण्यासाठी येथे येतात, तर थंडीच्या दिवसांमध्ये येथे बर्फ पडत असल्यामुळे येथे विंटर स्पोर्ट्सचेही आयोजन केले जाते. कारक्रॉस डेझर्ट हे वैज्ञानिक आणि भू-गर्भशास्त्रज्ञांच्यासाठी मोठे रिसर्च सेंटर म्हणूनही ओळखले जात आहे. येथे इतके मोठे वाळवंट कसे निर्माण झाले हे जाणून घेण्यासाठी अनेक शोधकार्ये येथे आज ही सुरु आहेत. येथे अनेक शतकांपूर्वी एक मोठा तलाव असून, हा तलाव सुकल्यामुळे येथे वाळवंट निर्माण झाल्याच काहींचे मत आहे. तर शास्त्रज्ञांच्या मते बेनेट तलावाजवळ धुळीची वादळे येत असल्याने या ठिकाणी वाळवंट निर्माण झाले आहे.

Leave a Comment