ही भाकिते ठरली अचूक आणि झाली खरी !

true
अनेकदा अनेक बाबतीत केली गेलेली भविष्यवाणी, हे खरे तर व्यक्त केलेले अंदाजच असतात. एखाद्या गोष्टीविषयी हाताशी असलेली माहिती आणि त्या काळामध्ये त्या गोष्टीशी निगडित परिस्थिती यावरूनच भविष्यामध्ये परिस्थिती कशी पालटू शकेल याचे कयास लावले जात असतात. कित्येकदा व्यक्त केले गेलेले हे अंदाज जरी अशक्यप्राय वाटत असले, तरी अनेकदा ही भाकिते अकस्मात खरी ठरतात आणि व्यक्त केले गेलेले अंदाज प्रत्यक्षात उतरतात. जागतिक इतिहासामध्ये अशी काही भाकिते खरी ठरल्याच्या घटना घडून गेल्या आहेत.
true1
सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन याने आपल्या मृत्यूचे भाकित केले होते. १८३५ साली अवकाशामध्ये ‘हेलीज् कॉमेट’ अवतरला, आणि त्यानंतर दोन आठवड्यांच्या काळानंतर मार्क ट्वेनचा जन्म झाला होता. मार्क ट्वेनचे आयुष्य मोठ्या नैराश्याने भरलेले होते. त्याच्या पत्नीचे, मुलांचे आणि मित्रांचे निधन झाल्यानंतर मार्क आणखीनच निराश मनस्थितीध्ये जगू लागला. दरम्यान हेलीज् कॉमेट पुनश्च अवतरला. त्यानंतर या कॉमेटच्या जाण्याची वेळ ही आपल्या आयुष्याची देखील अंतिम घटिका असल्याचे भाकित मार्कने केले, आणि घडले ही तसेच. या कॉमेट २० एप्रिल १९०९ साली दिसेनासा झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मार्क ट्वेनचे निधन झाले.
true2
१८९८ साली मॉर्गन रॉबर्टसन याने त्याच्या ‘टायटन’ नामक कादंबरीमध्ये एक प्रवासी जहाज मोठ्या हिमनगाला धडकून अटलांटिक महासागरामध्ये बुडाल्याच्या घटनेचे वर्णन केले आहे. टायटन हे प्रवासी जहाज अतिशय बळकट असून, कधीही बुडू न शकणारे मानले जात असल्याचा उल्लेख ही या कादंबरीमध्ये असून, पहिल्याच प्रवासाला निघाल्यानंतर या टायटनला झालेल्या अपघातावर या कादंबरीचे कथानक आधारित आहे. आता ही कादंबरी भविष्यकाळाचे भाकित म्हणा, किंवा सत्यात उतरलेली काल्पनिक कथा म्हणा, ही कादंबरी लिहिली गेल्यानंतर तब्बल चौदा वर्षांच्या नंतर ‘टायटॅनिक’ या जहाजाला अपघात घडला, आणि तो ही या कादंबरीमध्ये वर्णन केल्या प्रमाणेच घडला. कादंबरीमध्ये असलेली अपघाताची वर्णने आणि प्रत्यक्षामध्ये घडलेला अपघात हा विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल.
true3
१९ जून १९४१ साली तीन रशियन पुरातत्ववेत्त्यांनी तुर्को-मोंगोल तानाशाह तिमूर याची कबर खोदून काढीत असताना त्या कबरीवर त्यांना काही ओळी लिहिलेल्या आढळल्या. ‘जो कोणी ही कबर उघडेल, त्यावर तिमूरपेक्षाही क्रूर तानाशाह आक्रमण करेल’ अश्या अर्थाच्या त्या ओळी होत्या. तिमूर याला अमीर तिमूर या नावाने ही ओळखले जात असे. चौदाव्या शतकामध्ये मध्य आशिया आणि पर्शियामध्ये याने आपले साम्राज्य स्थापन केले होते. त्यानंतर १४०५ साली त्याचे निधन झाल्यानंतर त्याला उझबेकिस्तान मध्ये समरकंद येथे दफन करण्यात आले होते. १९४१ साली पुरातत्ववेत्त्यांनी त्याची कबर उघडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना धोक्याची सूचना देणाऱ्या त्या ओळी सापडल्या आणि त्या खऱ्या ठरल्या. ही कबर उघडली गेल्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या नंतर हिटलरने सोव्हियेत संघावर आक्रमण केले.

Leave a Comment