या वस्तू आजही समजल्या जातात शापित

fact
ज्या गोष्टींच्या मागे असलेल्या रहस्यांची उकल आजवर होऊ शकलेली नाही, अश्या गोष्टींबद्दल कुतूहल वाटणे अगदी साहजिकच आहे. एखाद्या वस्तूच्या मागे काही रहस्य आहे, किंवा काही रोचक कथा आहे असे कळल्यानंतर त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आणखीनच वाढते. तसेच जेव्हा एखादी वस्तू शापित आहे असे आपल्याला सांगितले जाते तेव्हा ती वस्तू पाहण्याचा, त्याबद्दल जाणून घेण्याचा मोहही आपल्याला आवरता येत नाही. या वस्तू आपल्या संग्रही असाव्यात अस कोणाला आवर्जून वाटत नसले, तरी या गोष्टींच्या मागे असणारा इतिहास, त्या वस्तूशी निगडित कथा जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते.
fact1
‘होप डायमंड’ नावाचा अतिशय तेजस्वी हिरा शापित असल्याचे म्हटले जाते. ज्या व्यक्तीने हा हिरा धारण केला, त्या व्यक्तीच्या बाबतीत काही ना काही अघटित घडले. जगातील अनेक मौल्यवान रत्नांपैकी अतिशय तेजस्वी म्हणून जगप्रसिद्ध असणारा हा हिरा सुमारे चारशे वर्षांपूर्वीचा आहे. ४५.५२ कॅरटचा हा हिरा मूळचा भारतातील आहे असे म्हटले जाते. हा हिरा राम-सीतेच्या एका प्राचीन मंदिरातील असून, हा हिरा सीतेच्या मूर्तीवर विराजमान असे. जेव्हा हा हिरा काढून घेतला गेला, तेव्हा मंदिराच्या पुजाऱ्याने हे पाप करणाऱ्याला शाप दिला, आणि तेव्हापासूनच हा हिरा जवळ बाळगणाऱ्या प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काही अशुभ घेडत गेले अशी आख्यायिका आहे. इतकेच काय, तर हा हिरा वापरून एखादा दागिना घडविणाऱ्या जव्हेऱ्यांना देखील अनेक संकटांना तोंड द्यावे लागल्याचे म्हटले जाते. सध्या हा हिरा स्मिथसोनियन वस्तू संग्रहालयामध्ये असून, त्यानंतर मात्र काही अघटित घडल्याचे ऐकिवात नाही.
fact2
स्वीडन येथे असणाऱ्या ‘ब्योर्कटोर्प रूनस्टोन’ या खडकावर शापवाणी कोरलेली आहे. या खडकाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवू पाहणाऱ्याचा सर्वनाश होईल असे ही शापवाणी म्हणते. स्वीडनच्या ब्लेकिंग भागामध्ये असलेला हा खडक एका दफनभूमीचा भाग असून, हा खडक ४.२ मीटर उंचीचा आहे. या खडकाच्या आसपास आणखी दोन खडक उभे असून, हे तीनही खडक गोलाकृतीमध्ये उभे आहेत. केवळ एका खडकावरच ही शापवाणी कोरलेली आहे. पुरातत्ववेत्त्यांच्या नुसार या खडकावर कोरलेला हा शिलालेख ( शापवाणी) सातव्या शतकातील असून, हा खडक सुरक्षित राहावा या उद्देशाने हा शिलालेख यावर कोरलेला असावा असा तज्ञांचा अंदाज आहे. मात्र त्यामुळे हा खडक खरेच शापित आहे किंवा नाही हे खात्रीपूर्वक सांगता येऊ शकत नाही.
fact3
न्यूझीलंड येथील माओरी जमातीमध्ये रूढ असलेल्या मान्यतेनुसार माओरी जमातीचे लोक लढाईवर जाण्यापूर्वी आपापले मुखवटे रंगवीत असतात. जर लढाईमध्ये एखादा लढवैय्या कामी आलाच, तर त्याचा आत्मा त्याच्या मुखवट्यामध्ये वास करीत असल्याची आख्यायिका येथे रूढ आहे. त्यामुळे हा ‘वॉरियर मास्क’ किंवा लढवैय्ये वापरीत असलेला मुखवटा माओरी जमातीमध्ये अतिशय महत्वाचा समजला जातो. हे मुखवटे दिसायला अतिशय सुंदर असून, यांवर अतिशय नाजूक कोरीवकाम केलेले असते. तसेच मासिक पाळी सुरु असताना महिलांनी या मुखवट्यांच्या आसपास फिरकणे देखील या जमातीमध्ये अशुभ समजले जाते. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांना देखील हे मुखवटे हाताळण्यास मनाई असते.
fact4
इजिप्तमध्ये १९२२ साली हावर्ड कार्टर नामक पुरातत्ववेत्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अचानक तुतन खामेनच्या समाधीचा शोध लागला. लहान वयातच मृत्यू पावलेल्या या इजिप्शियन राजाची शवपेटिका यांना सापडली, आणि या घटनेने त्यांना रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यांनतर घडणाऱ्या घटना जितक्या अनपेक्षित होत्या तितक्याच भयावहही होत्या. तुतन खामेनच्या शापामुळे या घटना घडल्या असाव्यात असे महटले गेले. या शोधकार्याचे प्रायोजक लॉर्ड कार्नार्वोन यांना म्हणायला तर फक्त डास चावला, पण ही जखम इतकी चिघळली, की त्याद्वारे विषाणूंचा संसर्ग होऊन त्यांचा मृत्यू झाला. ज्या रेडियोलॉजिस्टने तुतनखामेनच्या ‘ममी’चे एक्सरे घेतले होते, त्याचाही अंत अतिशय गूढ रित्या झाला. ही दफनभूमी पाहण्याच्या उद्देशाने येथे आलेल्या एका धनाढ्य अमेरिकन पर्यटकाचा देखील अचानक अंत झाला.

Leave a Comment