या घटना खरोखरच इतिहासामध्ये नमूद केल्याप्रमाणे घडल्या का?


इतिहासामध्ये घडून गेलेल्या घटनांची सत्यता पडताळून पाहण्याचे प्रयत्न अनेकदा केले गेले. काहींनी या घटनांमध्ये कितपत तथ्य आहे, हे पाहण्यासाठी त्यांचा अभ्यास केला तर काहींनी केवळ कुतूहलापोटी या घटनांकडे पहिले. मात्र इतिहासामध्ये काही घटना अश्या घडून गेल्या, की त्या घडून गेल्यानंतर इतक्या वर्षांनी देखील त्यामागील सत्य जगाच्या समोर कधी आलेच नाही. या घटनांबद्दल अजूनही अनेक रहस्ये आहेत, जी इतक्या वर्षांच्या अभ्यासानंतर, शोधांच्या नंतर आणि अथक प्रयत्नांच्या नंतर देखील उलगडलेली नाहीत. या घटना कश्या घडल्या असाव्यात या बद्दल अनेक तज्ञांची अनेक मते आहेत. मात्र यातील कुठल्या मतांमध्ये तथ्य आहे, ह्याची कल्पना मात्र कोणीच करू शकले नाही.

विल्यम शेक्सपियर नामक एक मोठा कवी आणि नाटककार होऊन गेला. पण हा मोठा नाटककार खरेच अस्तित्वात होता किंवा नाही, आणि असला, तरी त्याने लिहिलेले काव्य आणि नाटके त्यानेच लिहिली आहेत किंवा नाही, यावर साहित्य जगतात सतत उलटसुलट चर्चा होत असतात. विल्यम शेक्सपियर हा उच्चशिक्षित नव्हता, तसेच तो श्रीमंत घराण्यातील देखील नव्हता. त्या काळी उच्चशिक्षण हे केवळ उच्चभ्रू घराण्यांतील लोकांनाच परवडण्यासारखे होते. त्यामुळे जर शेक्सपियर शिकलेला नव्हता, तर त्याच्यामध्ये इतकी उत्तम काव्य आणि नाटके लिहिण्याची प्रतिभा कशी उत्पन्न झाली, अशी शंका काहींनी मांडली आहे. त्यामुळे त्याने लिहिलेले साहित्य त्याचे नव्हेच, असे काहींचे म्हणणे आहे.

अडॉल्फ हिटलर या अतिशय निर्दयी जर्मन तानाशाहाने आपले आयुष्य, आपल्या बंकरमध्ये गोळी झाडून घेऊन संपविले. तो दिवस ३० एप्रिल १९४५ चा होता. हिटलरच्या बंकरमध्ये त्याचा मृतदेह सापडला, त्याची ओळखदेखील पटविण्यात आली. मात्र याबद्दल नंतर काही वेगळीच कहाणी समोर आली. काहींच्या मते, जे शव सापडले ते हिटलरचे नव्हते, तर त्याच्यासारख्या दिसणाऱ्या दुसऱ्याच कोणाचे तरी होते. जेव्हा तथाकथित हिटलरचे शव सापडले, तेव्हा खरा हिटलर अर्जेन्टिना मध्ये होता, व त्यानंतर त्याने ब्राझीलला स्थलांतर केले असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. ‘ हिटलर इन ब्राझील ‘ नामक पुस्तकामध्ये याची नोंद आहे. ब्राझीलमध्ये एका विवक्षित ठिकाणी दडविलेला खजिना शोधून काढण्यासाठी हिटलर तिथे गेला असे काहीसे विचित्र वाटणारे तथ्य या पुस्तकामध्ये मांडण्यात आले आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन केनेडी यांची हत्या नक्की कोणी केली याबद्दल ही निरनिराळ्या तज्ञांची निरनिराळी मते आहेत. १९६३ साली २२ नोव्हेंबर रोजी केनेडी यांच्यावर एका अज्ञात इसमाने गोळीबार केला. या हत्येमागे नक्की कोणाचे कारस्थान आहे, हे अजूनही समजू शकलेले नाही. काहींच्या मते अमेरिकन गुप्तहेर खाते सीआयए, तर काहींच्या मते माफियाचा यामध्ये हात असावा. या हत्येसाठी एकूण ४२ गट, ८२ अट्टल आरेकरी आणि २१४ संशयित व्यक्तींवर निरनिराळ्या वेळी या हत्येचा आरोप लावला गेला. त्यामुळे ही हत्या नेमकी कोणी घडवून आणली, याबद्दल कोणतेही तथ्य समोर आलेले नाही.

जगामध्ये अनेक ठिकाणी परग्रहावरून पाठविल्या गेलेल्या उडत्या तबकड्या पाहायला मिळाल्याचे आपण ऐकतो. तसेच परग्रहावरील जीव ही अनेकदा पाहिले गेले आहेत. या घटना खरोखरच घडल्या किंवा ही केवळ कोणाची कल्पनाशक्ती आहे, यावरील वाद गेली अनेक दशके सातत्याने सुरु आहेत. अमेरिकेतील कॉलोराडो येथील कूपर नामक लहानशा गावामध्ये एक ‘ युएफओ वॉच टॉवर ‘ आहे. या ठीकाणाहून परग्रहावरून आलेल्या अनेक उडत्या तबकड्या ( युएफओ ) पाहिल्या जात असल्याचे म्हटले जाते. या घटना येथे इतक्या वारंवार घडतात, की त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा की नाही, असा संभ्रम निर्माण होतो.

Leave a Comment