जलपर्‍या पहायच्या आहेत? मग चला ब्रिटन, अमेरिकेला


समुद्रकिनार्‍यावर मनसोक्त भटकंती करताना आपल्यालाही लहानपणापासून आपण ऐकत आलेल्या गोष्टींतील जलपरी दिसावी असे अनेकांना वाटते. जलपरी म्हणजे अर्धे शरीर माणसाचे व अर्धे माशाचे असलेली सुंदर परी. वास्तविक अशा जलपर्‍या किंवा मरमेड प्रत्यक्षात कधीच नसतात हे आपल्याला माहिती आहे. मात्र तरीही कांहीतरी जादू घडावी आणि जलपरी भेटावी अशी इच्छा केली जाते. आजच्या आधुनिक जगात ही अपेक्षा साधी म्हणावी लागेल. कारण अमेरिका, ब्रिटनमध्ये गेलात तर तुम्ही या जलपर्‍यांना सहज पाहू शकता, भेटूही शकता.

या देशात मर्मेड हा आता व्यवसाय बनला असून तो गेल्या दोन वर्षात खूपच वेगाने वाढतो आहे. आकडेवारी असे सांगते की २०१५ साली १ हजार जणी या व्यवसायात मर्मेड म्हणून काम करत होत्या त्यात आता बरीच भर पडली आहे. कांही जणांनी प्रोफेशन म्हणून हा व्यवसाय निवडला आहे.यात काम एकच करायचे म्हणजे मर्मेडप्रमाणे कमरेखाली माशाचे शेपूट जोडून दिवसभर पाण्यात पोहाचये, खडकांवर लोळायचे किंवा बसून राहायचे. यात महिलांबरोबर पुरूषही आहेत.


ब्रिटनने या व्यवसायात आघाडी घेतली असून जुलैमध्ये येथे मिस मर्मेड स्पर्धाही प्रथमच भरविली गेली. जलपरी प्रशिक्षणासाठी शिबिरे घेतली जातात. गिनिज बुकमध्ये नोंद करण्यासाठी सीकी या पुरूष जलसुंदराने ३२४ जलपर्‍यासह बेक्साहिल समुद्रतटावर एक शो केला. वास्तविक जलपर्‍यांसंदर्भात कोणतेच रेकॉर्ड यापूर्वी नोंदविले गेलेले नाही.सिकी नोंदवेल तेच रेकॉर्ड असणार होते पण गिनिज मध्ये नोंद करायची तर किमान ३००चा आकडा पार करावा लागतो. यासाठी २३४ जलपर्‍या आल्या होत्या.


यासाठी सिकी स्वतःच अ्रावश्यक त्या माशांच्या शेपट्या सिलीकॉनपासून तयार करतो. त्यांच्या किमती अडीच लाखांच्या पुढे असतात व या शेपट्यांचे वजन असते २० किलोच्या दरम्यान. म्हणजे जेव्हा तुम्ही जलपरी म्हणून काम करता तेव्हा हे २०किलोचे शेपूट तुम्हाला वागवावे लागते. शिवाय एकदा शेपूट लावले की जमिनीवर चालता येत नाही.


आपला अनुभव शेअर करताना जलपरी बनलेली लॉरेन सांगते, मला लहानपणापासून घरचे मरमेड म्हणायचे कारण मला पाण्याची खूप ओढ आहे. मी जलपरी म्हणून काम सुरू केले व माझ्यात खूप बदल झाला. मी जणू पाण्याचा हिस्साच बनते. वाहत राहते व माझ्या सार्‍या चिंता, काळज्या गायब होतात.


अनेक मुलामुलींनी हे करियर म्हणूनही स्वीकारले आहे. त्यातील एक मुलगी सांगते जलपरी म्हणून काम करायचे ही अद्भूत गोष्ट आहे. पण शेपटी लावून अनेक तास पाण्यात राहणे, किंवा खडकांवर बसणे अवघड असते. शेपटी जड असते त्यामुळे पाय दुखतात पण लोकांना आम्हाला पाहिल्यावर जो आनंद मिळतो, तो या दुःखाचा विसर पाडतो.

Leave a Comment