हे आहेत जगामध्ये अस्तित्वात असलेले सर्वात तेजस्वी हिरे

diamond
‘पिंक लेगसी’ नामक गुलाबी रंगाचा अतिशय तेजस्वी हिरा, वजनाला एकोणीस कॅरटचा असला, तरी अतिशय दुर्लभ असल्यामुळे पन्नास मिलियन डॉलर्स, म्हणजेच तब्बल ३६२ कोटी रुपयांना खरेदी केला गेला आहे. प्रती कॅरटच्या हिशोबाने हा भाव पहिला, तर या हिऱ्याची किंमत विश्वविक्रमी ठरली आहे. ‘हॅरी विन्स्टन’ या अमेरिकन ब्रँडच्या वतीने, जेनेव्हा येथे आयोजित लिलावामध्ये या हिऱ्याची खरेदी करण्यात आली असल्याचे समजते. ‘क्रिस्टीज् ऑक्शन हाऊस’ च्या युरोपमधील प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार या हिऱ्याची प्रती कॅरट मागे किंमत, तब्बल एकोणीस कोटी रुपये असून, हे किंमत विक्रमी ठरली आहे. या हिऱ्याचा लिलाव सुरु होताच अवघ्या काही क्षणांमध्येच या हिऱ्याची विक्री पूर्ण झाली असल्याचे समजते.
diamond1
२०१६ सालच्या मे महिन्यामध्ये ‘ओपनहायमर ब्लू’ नामक हिरा ३२९ कोटी रुपयांमध्ये विकला गेला. १४.६२ कॅरटच्या या हिऱ्याच्या विक्रीचा व्यवहार जेनेव्हा येथील क्रिस्टीज् ऑक्शन हाऊसच्या वतीने दूरध्वनीच्या माध्यमातून केल्या गेलेल्या लिलावामध्ये पूर्ण करण्यात आला. या हिऱ्याची खरेदी कोणी केली याची अधिकृत माहिती मात्र प्रसिद्ध करण्यात आली नाही. २०१५ सालच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये एका बहुमूल्य अंगठीमध्ये जडविण्यात आलेला ‘ब्लू मून’ नामक हिरा १२.०३ कॅरटचा असून यासाठी केल्या गेलेल्या लिलावामध्ये हॉंगकॉंग येथील उद्योगपती जोसेफ लू यांनी तब्बल ४.८४ कोटी डॉलर्सची रक्कम मोजली. आपल्या सात वर्षांच्या मुलीसाठी लू यांनी या अंगठीची खरेदी केली असल्याचे समजते.
diamond2
गर्द लालसर छटेचा ‘सनराईज रुबी’ २५.२९ कॅरट वजनाचा असून, निनावी व्यक्तीने ३ कोटी डॉलर्सची रक्कम या माणिकासाठी दिली असल्याचे समजते. भारतीय चलनानुसार ही किंमत १९५ कोटी रुपये इतकी आहे. २०१५ साली या माणिकाची विक्री करण्यात आली होती. २०१३ साली क्रिस्टीज् च्या वतीने जगातील सर्वात मोठ्या नारिंगी रंगाच्या हिऱ्याची विक्री करण्यात आली. त्या काळी हा हिरा प्रती कॅरट १५.६ कोटी रुपये इतक्या किंमतीला विकला गेला होता. अतिशय चमकदार, गुलाबी छटा असलेला ‘ग्राफ पिंक’ या २७.७८ कॅरट वजनाच्या हिऱ्याला, लिलावामध्ये ४.६२ कोटी डॉलर्स इतकी किंमत मिळाली होती. नोव्हेंबर २०१० मध्ये आयोजित लिलावामध्ये या हिऱ्याची विक्री करण्यात आली. प्रसिद्ध ब्रिटीश डीलर लॉरेन्स ग्राफ यांनी हा हिरा खरेदी केला होता.

Leave a Comment