आता महिन्याभरासाठी भाडेतत्वावर गाडी देणार ओला

ola
मुंबई : अॅप्लिकेशनवर आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ‘ओला’ आता ग्राहकांना स्वत: वाहन चालवता यावं, अशी सेवा ओला सुरु करणार आहे. त्यासाठी कंपनीच्या ओला फ्लीट टेक्नॉलॉजीज युनिटला पुढील दोन वर्षांत 50 कोटी डॉलरचा आर्थिक पुरवठा करण्यात येत आहे. ओला कंपनीला ओला फ्लीट टेक्नॉलॉजीजच्या इक्विटी आणि बँडच्या संयोजनाद्वारे 50 कोटी डॉलर मिळेल. या पैशांतून कंपनीला देशात स्व-वाहन चालवण्याची सेवा सुरु करायची आहे. ‘ओला सेल्फी ड्राईव्ह’ असे नाव याला देण्यात आले आहे. ग्राहकांना याअंतर्गत ओला गाड्या स्वत: चालवता येणार आहेत. ग्राहक त्यासाठी महिन्याभरासाठीही गाडी भाड्यावर घेऊ शकतील.

ही सेवा सध्या बंगळुरुत सुरु करण्यात आली असून या सेवेसाठी बंगळुरु येथील ओला कंपनी 10 हजार वाहने लावण्याची शक्यता आहे. ग्राहकांकडून ओला सेल्फी ड्राईव्ह या सेवेला मिळालेल्या प्रतिसादानुसार वेगवेगळ्या प्रकारांत सुरु केले जाईल, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली. ही सेवा पुढील काही आठवड्यात देशभरात सुरु होण्याची शक्यता आहे.

कंपनीला या सेवेसाठी ओला फ्लीट टेक्नॉलॉजीज आर्थिक पुरवठा करेल. कंपनीने या सेवेसाठी ह्युंदाई मोटर्स आणि किआ मोटर्स कॉरपोरेशनसोबत करार केला आहे. यानुसार, या कंपन्या जागतिक बाजारात ई-वाहन प्रणाली आणि टॅक्सी सेवा विकसित करतील, असे या कंपन्यानी सांगितले आहे.

Leave a Comment