दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार नाना पाटेकर

nana-patekar
मीटू मोहिमे अंतर्गत अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अनेक आरोप केले होते. हे सर्व आरोप नाना पाटेकर यांनी फेटाळून लावल्यानंतर नानांसोबत काम करण्यास ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी नकार दिला होता. नाना या आरोपांनंतर हिंदी चित्रपटात दिसले नाहीत. पण आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते लवकरच तेलगू इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेलगू चित्रपटात नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नाना दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्या ‘नन्ना नेनू’ या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे. नाना पाटेकर यांच्या संपर्कात या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, या भूमिकेसाठी त्यांना लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास होते. नाना पाटेकर या भूमिकेसाठी योग्य आहेत, असे श्रीनिवास यांना वाटते. सध्या नाना पाटेकर यांच्यासोबत या चित्रपटासंदर्भात बोलणी सुरू असून अद्याप या चित्रपटाचे कथानक गुलदस्त्यात आहे.

Leave a Comment