भारतातील या गावांची आहे वेगळीच ओळख


भारत हा खेड्यांचा देश आहे. मात्र यातील कांही छोटी गांवे अथवा खेडी कांही वेगळ्याच गोष्टींमुळे केवळ देशातच नाही तर परदेशांतही प्रसिद्धीस आली आहेत. त्यातील कांहीची ही माहिती


रघुराजपूर- ओडिसा राज्यातील या गावाला २००० साली राज्याचे पहिले हेरिटेज गांव म्हणून ओळख मिळाली आहे. हे गांव पट्टचित्र कलेसाठी ओळखले जाते. येथे ट्रायबल पेटींग, पेपर मॅश खेळणी, लाकडी खेळणी बनविली जातात. यावर अत्यंत सुंदर अशी पेटींग्ज असतात. या गावातील लोक या कलेवरच उदरनिर्वाह करतात. या गावातील प्रत्येक व्यक्ती कलाकार आहे. जगन्नाथपुरीपासून थोडे दूर असलेले हे गांव, वर्षभरात कधीही भेट दिली तरी त्याच्या कलेत रंगलेले पाहायला मिळते.


तिलौनिया- या गावाची ओळख तर आणखीनच वेगळीआहे. राजस्थानातील अजमेर जवळ असलेल्या या गावातील प्रत्येक व्यक्ती सोलर तज्ञ आहे. या गावातील प्रत्येक घरावर सोलर पॅनल बसविली आहेत. संजित रॉय यांनी येथील नागरिकांना सोलर तज्ञ बनविले असून अगदी घुंघट घेणार्‍या बायकांपासून ते लोहारकाम करणारे, शेतकरी सर्व सोलर पॅनल बसविणे, त्याची दुरूस्ती करणे ही कामे करतात.


मट्टूर- हजारो वर्षे जुन्या व प्राचीन भारतीय संस्कृतीचे रक्षण या गावाने केले आहे. या गावातील प्रत्येक जण मग तो लहान मुल असो वा वयोवृद्ध असो, पुरूष असो वा स्त्री असो, श्रीमंत असो वा गरीब असो संस्कृत भाषेतच बोलतात. केवळ संस्कृत बोलत नाहीत तर वैदीक काळाप्रमाणे जीवन जगतात. संस्कृतचे गांव अशीही याची ओळख आहे. येथे पाच वर्षाचे मूल झाले की त्याला वैदिक पाठशाळेत घातले जाते व तेथे त्याचे संपूर्ण शिक्षण संस्कृतमधून होते. बंगलोरपासून ३०० किमीवर हे गाव आहे.

कथेवाडी- महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील हे गांव एकेकाळी दारूड्यांचे गांव म्हणून ओळखले जाई. मात्र आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रमुख व आध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकर यांनी हे गांव दत्तक घेतले व त्याचा कायापालट केला. हे गाव आता देशाचे मॉडेल व्हीलेज बनले असून येथील कोणीही अल्कोहोलला स्पर्शही करत नाहीत.


वेळास- रत्नागिरी जिल्ह्यातले हे गांव कासवांचे गांव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. एका एनजीओने हे गांव दत्तक घेतले असून फेब्रुवारी ते मार्च मध्ये या गावात कासव उत्सव भरतो. समुद्रात परत जाणारी कासवे पाहण्यासाठी दरवर्षी येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. येथे कासवांनी घातलेल्या अंड्यांचे संरक्षण केले जाते व त्यातून कासवांची पिले बाहेर पडली की ती परत समुद्रात जाईपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवले जाते.


लांबासिंगी- आंध्रातील हे गांव कांही वर्षापूर्वी येथे झालेल्या बर्फवृष्टीमुळे एकदम प्रकाशात आले. वास्तविक दक्षिणेकडे कोठेच बर्फ पडत नाही. मात्र विशाखापट्टणम जवळच्या या गावात कांही वर्षापूर्वी चांगलाच बर्फ पडला तेव्हापासून ते दक्षिणेकडील काश्मीर म्हणून ओळखले जाते. येथे थंडीत पर्यटक आवर्जून येतात. डिसेंबर ते फेब्रुवारी हा सीझन या गावाला भेट देण्यासाठी सर्वात चांगला मानला जातो.येथे कॉफी व मिरी चे मोठे उत्पादन होते व बहुतेक माल निर्यात होतो

Leave a Comment