दही, बहुगुणी आणि आरोग्यदायी पदार्थ

curd
प्रत्येक ऋतूनुसार भारतीय थाळीतील पदार्थ बदलत असतात. हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे मसालेदर पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले जातात तर पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते म्हणून ताजे आणि पचायला हलके पदार्थ खाल्ले जातात. उन्हाळा आला कि पोटात गारवा उत्पन्न करणारे आणि मरगळ घालवून उर्जा देणारे पदार्थ खाल्ले जातात. आयुर्वेदात स्वस्थ राहण्यासाठी दिनचर्या आणि ऋतुचर्या सांगितली गेली आहे त्यात कोणत्या ऋतूत कोणते पदार्थ आरोग्यपूर्ण ठरतात याचे विवेचन आले आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात जेवणाच्या ताटात दही वाटी अहम भूमिका बजावताना दिसते. दही केवळ ताटाची शोभा वाढविते असे नाही तर जेवणाला स्वाद आणि रुची देते. दही सेवनाचे शरीराला खूप फायदे होतात. दह्यातील कॅल्शियम, प्रोटीन, लॅक्टेज, फॉस्फरस अश्यासारखे रासायनिक पदार्थ शरीरासाठी आवश्यक आहेत. उन्हाळ्यात दही अधिक प्रमाणात खाणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरते कारण त्यामुळे पोटात थंडावा राहतो. पित्त कमी होते.

curd11
हृदयासाठी दही फायदेशीर आहे. रक्तात अधिक प्रमाणात कोलेस्टेरॉल असेल तर रक्तवाहिन्या अरुंद होऊन रक्तप्रवाह सुरळीत राहत नाही. दह्याचे सेवन रक्तातील हे कोलेस्टेरॉल कमी करण्यास सहाय्य करते आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत मिळते. दही मनावरील तसेच मेंदूवरील ताण कमी करणारे आहे. रोज दही खाल्ले तर शरीराचा थकवा दूर होतो आणि उर्जा मिळते.

दही आणि मध यांचे मिश्रण तोंडात चरे पडले असतील म्हणजे तोंड आले असेल तर त्यात आराम देते. मध नसेल तर नुसते दही सकाळ संध्याकाळ खाल्ले तरी आलेले तोंड कमी होते. दह्यामुळे पचन सुधारते आणि पोटाचे विकार दूर होतात. शरीरातील जादा चरबी कमी करण्यासाठी दही सेवन उपयुक्त आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी दही खावे. दह्यातील कॅल्शियम आणि फॉस्फरस मुळे दात आणि हाडे बळकट होतात.

अनेकांना दही सोसत नाही. त्यांनी दह्यात पाणी घालून त्याचे ताक घ्यावे. ताकात थोडे आले, मीठ आणि जिरे पूड घातल्यास तोंडाला रुची येते. थंडी पावसाळ्याच्या दिवसात दही खायचे असेल तर दही विरजताना त्यात दोन चार काळे मिरे घालून विरजावे. असे दही थंडी पावसाळ्यात बाधत नाही. बंगाली लोक दही विरजताना त्यात थोडी साखर घालतात आणि मिष्टी दही बनवितात. हे दही अतिशय रुचकर आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment