उन्हांच्या झळांपासून स्वतःला वाचवा


हवामानातला अचानकपणे होणारा बदल हा सामान्य माणसालासुध्दा आजारी बनवतो. थकावट, त्वचेला खाज सुटणे, भूक मंदावणे आणि सर्दी खोकला असे विकार हवामानातल्या बदलाने संभवतात. आता अचानकपणे उष्णतेची लाट येत आहे. अशावेळी असे कोणतेही अचानकपणे उद्भवणारे आजार आपल्याला होऊ नयेत यासाठी खालील दक्षता घेण्याचा सल्ला डॉक्टर मंडळी देतात. या काळामध्ये क जीवनसत्त्वयुक्त आणि विशेषतः आंबट फळे खाल्ली पाहिजेत. स्वच्छता राखली पाहिजे. आपल्या घराच्या आसपास पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या काळात वारंवार तहान लागते आणि आपण पाणी पित राहतो. दिवसात किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिले पाहिजे. परंतु ते पाणी पित असतानाही काही थंड पेये आवर्जुन घेतली पाहिजेत.

या काळात लिंबू सरबत किंवा शहाळे, उसाचा रस यांचे प्राशन दिवसभरात एकदोनदा केले पाहिजे. त्या पेयांमुळे आपल्या शरीरातली डी हायड्रेशनमोठी होणारी झीज टळते आणि शरीरातील पाणी टिकून राहते. या काळात ताक पिणे जास्त हितकारक ठरते. शक्यतो अल्कोहोल टाळले पाहिजे आणि चहा, कॉफीचे प्राशनसुध्दा मर्यादित केले पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसात एकदम भरपूर जेवण करू नये. दिवसातून चारवेळा पण थोडे थोडे जेवण करावे. कार्बोहायड्रेट आणि प्रथिने यांची विपुलता असणारे अन्न टाळावे. हलके जेवण करावे. जेवणात ताक असावे. आजकाल काही विशिष्ट प्रकारचे विजेचे गोळे वापरण्याचा आग्रह धरला जात आहे. मात्र त्यातले काही दिवे हे उष्णता निर्माण करणारे आहेत ते टाळावे. संगणकासमोर फारवेळ बसू नये. कारण संगणकसुध्दा उष्णता निर्माण करतो.

लहान मुलांच्या बाबतीत तरी फार काळजी घेतली पाहिजे. लहान मुले फार वेळ घराबाहेर उन्हामध्ये फिरणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विशेषतः लहान मुले उपाशी पोटी खेळतात तेव्हा त्यांना उन्हाची बाधा होण्याची शक्यता असते. म्हणून मुलांना खेळायला बाहेर जाण्याआधी काहीतरी खायला द्यावे. विशेषतः थंड पेय द्यावे. सध्या लिंबू शरबत, लस्सी, ताक, पन्हे, उसाचा रस ही परंपरागत पेये आपण बाद केली आहेत पण ती मुलांच्या आरोग्यासाठी हितकारक असतात. लहान मुलांना भरपूर पाणी पिण्यास प्रोत्साहित करावे. त्या पाण्यातून शक्यतो ग्लुकोज विरघळून द्यावे. त्यामुळे घामातून होणारा काही द्रव्यांचा र्‍हास भरून निघू शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment