जगातील सर्वात छोटे बेट, जस्ट रूम इनफ

island
सुट्ट्यांचे दिवस म्हणजे मनसोक्त भटकंतीचे दिवस. जगात यासाठी अनेक सुंदर जागा आहेत. पहाड, समुद्र किनारे, जंगले, मोकळी विशाल मैदाने, वाळवंटे अश्या विविध प्रकरणी आपली धरती समृद्ध आहे. याच बरोबर जगात लाखोंच्या संख्येने बेटे किंवा आयलंड आहेत. नदी अथवा समुद्रात मध्येच उचावर असलेला जमिनीचा तुकडा म्हणजे बेट. अर्थात लोकांना माहिती नाहीत अशीही अनेक बेटे आहेत पण सध्या तरी जगातील सर्वात छोटे बेट म्हणून जस्ट रूम इनफ नावाच्या बेटाची नोंद झाली असून गीनीज बुक ने तसे सर्टिफिकेट या बेटाच्या मालकाला दिले आहे.

हे बेट एखाद्या टेनिस कोर्टच्या आकाराचे आहे. या बेटावर फक्त एक घर आणि एक झाड आहे. न्यूयॉर्कच्या अलेक्झांड्रिया बाय जवळ हे बेट आहे. त्याचे क्षेत्रफळ ३३०० चौरस फुट असून जगभरात दोन हजार बेटे आहेत त्यातले हे एक आहे. त्याच्या आकारावरून ते गिनीज बुक मध्ये सर्वाधिक छोटे म्हणून नोंदले गेले आहे. यापूर्वी हा खिताब बिशप रॉक या बेटाला मिळाला होता मात्र जस्ट रूम इनफ त्यापेक्षाही छोटे ठरले आहे. हे बेट थाउजंड आयलंड बेटांचा एक भाग आहे. जेव्हा या बेटावर काहीच नव्हते तेव्हा ते हब आयलंड नावाने ओळखले जात होते.

सेंट लॉरेन्स नदीतील हे बेट १९५० साली सिझलंड कुटुंबाने विकत घेतले होते. या बेटावर एक छान छोटेसे घर बांधून एकांतात राहण्याचा त्यांचा विचार असावा. पण एखाद्या बेटाला ते बेट म्हणून मान्यता मिळण्यासाठी काही नियम आहेत. त्यानुसार ही जागा किमान १ चौरस फुट, पाण्याच्या वर वर्षभर राहणारी हवी. त्यावर एक तरी झाड हवे. म्हणून या बेटावर मालकाने झाड लावले. घर बांधताना भिंती अगदी जमीनच्या कडेवर असल्या तरी घरापुढे थोडी हिरवळ आहे.

एकांतात राहण्याची या बेटाच्या मालकाची इच्छा आता पूर्ण होत नाही कारण हे जगातील सर्वात छोटे बेट ठरल्याने येथे अनेक पर्यटक सतत येतात. तरीही वर्दळीपासून दूर, वाहतूक कोंडीपासून दूर आणि गोंगाटापासून दूर असलेले हे बेट मालकासाठी अभिमानाचे ठिकाण आहे.

Leave a Comment