उदयनराजे भोसले यांना येथील जनता आता कंटाळली आहे – चंद्रकांत पाटील

chandrakant-patil
सातारा – लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येते आहे तसतसे राजकीय नेत्यांवर होणारी चिखलफेक जोरदार सुरु होते. त्यातच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातारा येथे भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना मतदार संघातील जनता कंटाळली असून त्याचा फायदा घ्या आणि भाजप-सेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या विजयासाठी जिवाचे रान करा, असे आवाहन केले आहे.

सातारा व माढा मतदारसंघासह राज्यातील ४५ जागांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. ही बैठक चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. उदयनराजे भोसले यांच्यावर पाटील यांनी यावेळी टीकास्त्र सोडले. पाटील म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघातील जनतेचा उदयनराजे भोसले यांच्याकडून भ्रमनिरास झाला आहे. आता जनता त्यांना कंटाळली असून, उदयनराजेंच्या पराभवात भाजपच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभागी व्हावे. भाजपसाठी देशात आणि राज्यात चांगले वातावरण आहे. लोकांच्या पसंतीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधलेला विकास उतरला आहे. युतीतील सर्व घटकांना विश्वासात घेऊन नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवावी, असे देखील पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment