काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या निबांळकरांना माढ्यातून तिकीट

ranjit-singh-nimbalkar
मुंबई – भाजपने मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आज देशभरातील ११ उमेदवारांची बारावी यादी भाजपने जाहीर केली. नाईक यांच्या नावाचा त्यात समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांची लढत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांच्याबरोबर होईल.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून माढा मतदारसंघात रोज वेगवेगळ्या घडामोडी घडत होत्या. त्यातच उमदेवार देण्यासाठी भाजपला मोठा काथ्याकूट करावा लागला. ऐनवेळी राष्ट्रवादीतून आलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळेल असे बोलले जात होते. भाजपने उमेदवारी दिल्यास लढण्याची तयारी रणजितसिंह यांचे वडील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते यांनीही दर्शवली होती. पण यात बाजी मारत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी मिळवली.

सुरूवातीला भाजपकडून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले संजय शिंदे यांचे नाव चर्चेत होते. पण भाजपत मोहिते पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर संजय शिंदे यांनी त्वरीत राष्ट्रवादी प्रवेश केला. राष्ट्रवादीनेही त्यांना उमेदवारी जाहीर केली. गेल्या साडेचार वर्षांपासून भाजपच्या सहकार्यावर संजय शिंदे हे जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. संजय शिंदे आणि मोहिते पाटील कुटुंबीयात राजकीय वाद आहेत.

Leave a Comment