जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या नीता अंबानींच्या फोटो मागील सत्य

neta-ambani
मुंबई: काही दिवसांपूर्वीच रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याचा शाही विवाह मोठ्या थाटात पार पडला. याची चर्चा सगळीकडेच खुप झाली. पण सध्या सोशल मीडियावर आकाशच्या लग्नात सैन्याचा ‘वापर’ केल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. नीता अंबानी यांचा जवानांसोबतचा एक फोटोदेखील या पोस्टसोबत शेअर करण्यात येत आहे. यावरुन अनेकजण मोदी सरकारवर टीका करत आहेत.

अनेकजण भारताचे अभिनंदन! मुकेश अंबानींच्या मुलाच्या लग्नात आपल्या सैन्याचा वापर केला जात आहे. भाजप/आरएसएसच्या 5 वर्षांच्या राजवटीत आपण येथे येऊन पोहोचलो आहे. लज्जास्पद!,’ असा मजकूर लिहिलेली पोस्ट शेअर करत आहेत. नीता अंबानींचा फोटो देखील यासोबत व्हायरल होत आहे. गणवेशातील जवानांसोबत यामध्ये त्या उभ्या आहेत. आपल्या सैन्याचा वापर एका श्रीमंत व्यक्तीच्या कार्यक्रमात केला जात आहे. भारत म्हणजे एक विनोद झाला आहे. संपूर्ण जग आपल्यावर हसत आहे, अशी देखील एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या फोटोची आणि त्यासोबतच्या मजकुराची फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅपवर जोरदार चर्चा आहे.

नीता अंबानींचा हा फोटो खरा आहे. पण त्यासोबत असलेला मजुकर पुर्णतः चुकीचा असून सुरक्षा दलातील 7 हजार कर्मचाऱ्यांसाठी अंबानींकडून म्युझिकल फाऊंटन शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला. जवानांसोबतचा नीता अंबानींचा फोटो इंटरनेटवर सर्च केल्यास याबद्दलचे सत्य समोर आले. हा फोटो अनेक संकेतस्थळांनी बातमीत वापरला आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांच्याकडून मुलगा आकाशच्या भव्यदिव्य लग्न सोहळ्यानंतर सैन्य आणि पोलीस दलातील 7 हजार कर्मचाऱ्यांसाठी म्युझिकल फाऊंटन शोचे आयोजन, अशा आशयाची माहिती फोटो सर्च केल्यानंतर मिळते. लष्कर, नौदल, निमलष्करी दल, मुंबई पोलीस, रेल्वे सुरक्षा दलांचे कर्मचारी या कार्यक्रमाला त्यांच्या कुटुंबांसह उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन बांद्र्यातील जिओ वर्ल्ड सेंटरमधल्या धीरुभाई अंबानी स्क्वेअरमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन देशाच्या संरक्षणासाठी अविरत झटणाऱ्या सुरक्षा दलांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी करण्यात आले होते.

Leave a Comment