झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने स्वतःच्याच जेवणात टाकला मेलेला उंदिर

food
तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जेवणात कधी झुरळ तर कधी अळ्या आढळल्याच्या घटना गेल्या काही दिवसात ऐकल्या असतील. पण चीनमधील एका व्यक्तीने आता अजब-गजब आणि तेवढाच किळसवाणा प्रकार केला आहे. एका रेस्टॉरंटमध्ये तो जेवायला गेला होता. तिथे गेल्यावर त्याने जेवण ऑर्डर केले आणि त्याने त्या जेवणात मेलेला उंदीर टाकल्यानंतर तो रेस्टॉरंट मालकाला ब्लॅकमेल करू लागला. त्याचबरोबर त्याने रेस्टॉरंट मालकाकडे ५ कोटी रूपयांची मागणीही केली.

चीनच्या बिजिंग शहरात ही घटना घडली आहे. चीनच्या पॉप्युलर फूड चेन कंपनी हॅदीलाओमध्ये गुओ नावाची ही व्यक्ती गेली होती. त्यावेळी त्याच्यासोबत पत्नी देखील होती. त्याने २० मिनिटांनंतर दावा केला की, त्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर निघाला. त्यानंतर रेस्टॉरंट मालकाने त्याला मोफत जेवणाची ऑफर दिली. पण या व्यक्तीने काही एक ऐकले नाही. त्यानंतर रेस्टॉरंट मालकाने या व्यक्तीला २० हजार युआन म्हणजेच २ लाख रूपये देण्याची ऑफरही दिली. पण ही ऑफर सुद्धा त्याने नाकारली. गुओ म्हणाला की, त्याला ५ मिलियन युआन म्हणजेच ५ कोटी रूपये हवे आहेत.

त्यानंतर हे प्रकरण एवढे चिघळले की, पोलिसांना पाचरण करावे लागले. त्यानंतर चौकशी झाली. तेव्हा समोर आले की, गुओने स्वत: त्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर ठेवला होता. हा प्लॅन गुओने रेस्टॉरंटला ब्लॅकमेल करण्यासाठी केला होता. पण पोलिसांनी त्याची पोलखोल केली. गुओने सांगितले की, घरातून निघताना त्याला एक मेलेला उंदीर आढळला. तो बॉटलमध्ये टाकून हा उंदीर घेऊन रेस्टॉरंटमध्ये गेला. त्याने सोबतच हे सांगितले की, त्याने हे जेवण फ्रि मिळावे म्हणून केले. पण त्याची लालसा वाढली होती. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Comment