वाराणसीतून मोदींच्या विरोधात लढणार चंद्रशेखर आझाद

chandrashekhar-azad
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवणार असून याच मतदार संघातून तामिळनाडूतील शेकडो शेतकरी देखील निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आम्ही तुम्हाला दिले होता. पण आता भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. मोदींविरोधात महाआघाडी आव्हान उभे करू शकत नसल्यामुळे मी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

शनिवारी वाराणसीत भीम आर्मीने एका मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. आझाद हे स्वत: या रॅलीत सहभागी होणार असल्याचे भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन यांनी सांगितले आहे. शनिवारी वाराणसी दौऱ्यासाठी मी जिल्हा प्रशासनाची परवानगी मागितली आहे. या मतदारसंघातून मी निवडणूक लढत असून माझ्या प्रचाराची सुरुवात म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते. एका धार्मिक स्थळावरून आम्ही सुरुवात करणार होतो. आम्ही त्यासाठी वाराणसीतील रविदास मंदिराची निवड केली आहे. दुचाकीवर आम्ही रविदास गेटपर्यंत म्हणजे सुमारे 7 किमी जाणार असल्याचे चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले आहे.

एक अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणुकीत उभा राहणार आहे. उत्तर प्रदेशमधून देशाला दुबळा करणारा व्यक्ती जिंकावा असे मला वाटत नाही. मी पूर्वीच स्पष्ट केले आहे की, मायावती, अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव हे जर या मतदारसंघातून निवडणूक लढू इच्छित नसतील तर मी वाराणसीतून उभा राहीन. मोदींविरोधात एक सशक्त उमेदवार उभा राहणे आवश्यक होते. पण तसे दिसत नव्हते. मी मोदींना सहज जिंकू देणार नाही, असेही आझाद यांनी म्हटले आहे.

Leave a Comment