लवकरच येणार गर्भनिरोधक दागिने

jewellery
जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधील संशोधकांनी गर्भनिरोधक हार्मोन नियोजन करून बर्थ कंट्रोल करता येईल असे एक तंत्र विकसित केले असून महिला नेहमी वापरत असलेल्या दागिन्यांचा त्यासाठी वापर करता येणार आहे. आवश्यकतेनुसार गर्भनिरोधक हार्मोन शरीरात सोडणारे पॅचेस त्यासाठी वापरले जाणार आहेत. हे पॅचेस अंगठ्या, कानातील डूल, घड्याळे अश्या त्वचेशी सतत संपर्कात राहू शकणाऱ्या दागिन्याच्या मागे लावले जातील असे सांगितले जात आहे. या दागिन्यांना कॉन्ट्रासेप्टीव्ह ज्युवेलरी असे नाव दिले गेले आहे. अर्थात अजून याच्या मानवावर चाचण्या झालेल्या नाहीत मात्र डुकरांचे कान आणि उंदराच्या त्वचेवर त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

contra
या संशोधन टीमचे प्रमुख आणि स्कूल ऑफ केमिकल अँड बायोमॉलेक्यूलर इंजिनीअरिंगचे प्रोफेसर मार्क म्हणाले यामुळे महिलांना अधिक प्रमाणात गर्भनिरोधक पर्याय उपलब्ध होणार आहेत. या संदर्भातला एक अहवाल जर्नल ऑफ कंट्रोल्ड मध्ये प्रकाशित झाला आहे. जेव्हा हे कॉन्ट्रासेप्टीव्ह दागिने महिला शरीरावर घालतील तेव्हा तिला गर्भनिरोधक हार्मोनची पुरेसा डोस मिळू शकेल. त्यामुळे बर्थ कंट्रोलचे काम होणार आहे. आम्ही प्रयोग करताना हे पॅचेस उंदराच्या त्वचेवर १६ तास ठेवले आणि ८ तास बाजूला काढले. तेव्हा या काळात गर्भनिरोधक हार्मोनची पातळी घटली असे दिसले. त्यामुळे जेव्हा हे दागिने महिला घालणार नाहीत तेव्हा त्यांच्या शरीरातील गर्भ निरोधक पातळी नॉर्मल राहील. ज्या महिलांच्या शरीरात असे हार्मोन पुरेश्या प्रमाणात नसतात त्यांना हे कॉन्ट्रासेप्टीव्ह दागिने गर्भनिरोधक म्हणून खात्रीने वापरता येतील. हे दागिने बनविताना ट्रान्सडर्मल तंत्राचा वापर केला गेला आहे.

यापूर्वी असेच पॅच ज्यांना धूम्रपान सोडायचे आहे त्यांच्यासाठी बनविले गेले होते. त्या पॅच मध्ये निकोटीनचा वापर केला गेला होता. आता बर्थ कंट्रोल साठी दागिने स्वरुपात ते बाजारात येतील तेव्हा जगभरातील महिलांना त्याचा उपयोग होऊ शकेल असा दावा केला जात आहे.

Leave a Comment