भेटा जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांना

pets
आपल्या पाळीव प्राण्यांबद्दल प्रेम सर्वांच्याच मनामध्ये असते, पण काही लोकांसाठी त्यांचे पाळीव प्राणी हेच त्यांचे सर्वस्व असतात. या लोकांचे त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठीचे प्रेम हे सर्व मर्यादांच्या पलीकडचे असते, इतके की काही प्राणीप्रेमी आपल्या संपत्तीतील काही भाग किंवा कधी आपली सर्व संपत्ती देखील आपल्या पाळीव प्राण्यांच्या नावे करून मोकळे होतात. अश्या या श्रीमंत पाळीव प्राण्यांची यादी, ‘कम्पेअर द मार्केट’च्या वतीने नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मध्ये समाविष्ट असलेले पाळीव प्राणी जगभरातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी असून, त्यांच्यासाठी कोट्यवधी डॉलर्सच्या संपत्तीची तरतूद त्यांच्या मालकांनी करून ठेवली आहे.
pets1
ब्रिटीश अब्जाधीश प्रकाशक माईल्स ब्लॅकवेल यांनी आपल्या लाडक्या कोंबडीच्या नावे पंधरा मिलियन डॉलर्सची तरतूद आपल्या मृत्यू पत्रामध्ये केली होती. माईल्स यांच्या मृत्युच्या पश्चात त्यांच्या इच्छेप्रमाणे पंधरा मिलियन डॉलर्स ‘गीगु’ नामक त्यांच्या कोंबडीच्या नावे ठेवण्यात आले आहेत. आपल्या संभाषणचातुर्याच्या जोरावर जगभरातील सुप्रसिद्ध व्यक्तीमत्वांच्या अतिशय गाजलेल्या मुलाखती घेणाऱ्या ओप्रा विनफ्रे हिचा शो अतिशय लोकप्रिय असून, आजवर ओप्राने कोट्यावधी डॉलर्सची किमाई या शोच्या माध्यमातून केली आहे. ओप्रा कडे सेडी, सनी, लॉरेन, लेअला, आणि ल्युक हे कुत्रे असून यांच्या नावाने ओप्रा हिने तब्बल तीस मिलियन डॉलर्सच्या संपत्तीची तरतूद आपल्या मृत्युपत्रामध्ये करून ठेवली आहे.
pets2
अमेरीकेतील सुप्रसिद्ध, सौंदर्यवती गीतकार आणि गायिका टेलर स्विफ्ट हिने तिच्या ऑलिव्हिया बेन्सन नावाच्या मांजरीच्या जोडीने अनेक जाहिरातींमध्ये भाग घेतला आहे. त्यांपैकी ‘डायट कोक’ आणि ‘केड्स शूज’ या दोन्ही जाहिराती अतिशय लोकप्रिय ठरल्या. ही स्कॉटिश फोल्ड मांजर तब्बल ९७ मिलियन डॉलर्सची मालकीण आहे. तर अनेक धनाढ्य जर्मन राजपरिवारांच्या पैकी एका परिवाराच्या सदस्य असलेल्या काऊंटेस कार्लोटा लाईबेनस्टाईन यांनी तब्बल ३७५ मिलियन डॉलर्सची संपत्ती त्यांच्या ‘गुंथर vi’ या जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याच्या नावे केली आहे. सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांच्या यादीमध्ये गुंथरचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

Leave a Comment