राहुल गांधींच्या ‘न्याय’ योजनेला रघुराम राजन यांचे अप्रत्यक्ष समर्थन

raghuram-rajan
नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण असतानाच एक मोठा खुलासा केला आहे. आपण जेव्हा आरबीआयचे गव्हर्नर होतो त्यावेळी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे एक प्लॅन दिला होता. या योजनेचे न्याय असे नाव होते आणि शेतकरी कर्जमाफीपेक्षा ती योजना चांगली होती. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यापेक्षा त्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये देणे आणि त्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहित करणे चांगला पर्याय होता. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा गौप्यस्फोट रघुराम राजन यांनी केला. ते सध्या शिकागो विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

आरबीआयचे माजी गव्हर्नर राजन म्हणाले, की काँग्रेसला सुद्धा ‘न्याय’ ही योजना घोषित करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात अशाच स्वरुपाची योजना लागू करण्याचे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिले. काँग्रेसची सत्ता देशात आल्यास गरीबांना दरवर्षी 72 हजार अर्थात दरमहा 6 हजार रुपये थेट बँक खात्यात देणार असा दावा राहुल यांनी केला. अशात शेतकऱ्यांची मदत करण्याचा काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडे चांगला पर्याय असल्याचे राजन म्हणाले.

आपण अर्थकारणाच्या बाबतीत कुठल्याही पक्षाला किंवा नेत्याला सल्ला देण्यास तयार आहोत. कशा पद्धतीने देशाच्या विकासात मदत करता येईल हे पाहणे महत्वाचे आहे. काँग्रेसने याच दृष्टीकोनातून या योजनेची घोषणा केली. ते योजना अंमलात आणण्यासाठी व्यूहरचना तयार करण्यापासून तांत्रिक आणि आर्थिक सल्लामसलत अशा सर्वच स्वरुपाची मदत करण्यास आपण तयार असल्याचेही ते पुढे म्हणाले. अर्थतज्ज्ञ राजन सध्या आपले नवीन पुस्तक ‘द थर्ड पिलरः हाऊ मार्केट्स अॅण्ड स्टेट लीव द कम्यूनिटी बीहाइंड’ च्या प्रचारासाठी भारत दौऱ्यावर आहेत.

Leave a Comment