मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना ट्रेनमध्ये मिळणार फ्री वायफाय

wifi
मुंबई – मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी मनोरंजनकारक होणार आहे. कारण मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांसोबतच लोकल ट्रेनमध्ये वायफायचे हॉटस्पॉट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार हि सुविधा माहिती आणि मनोरंजन या तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मुंबईकरांचे जीवन हे धकाधकीचे असते हे काही आपल्याला नवीन सांगायला नको. त्यातच ट्रेनमध्ये असलेली गर्दी विलक्षण असते. त्यातच थोडा विरंगुळा म्हणून चाकरमानी आपल्या कामावर जातेवेळी आणि परतीच्या वेळी मोबाईलमध्ये घुसलेले असतात. यात चॅटिंग, डाऊनलोड, अपलोड असे काहीना काही सुरुच असते. पण आता याचा चाकरमान्यांना धावत्या लोकल ट्रेनमध्ये लाइव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून चित्रपट, गाणी, बातम्या, मालिका तसेच क्रिकेटचे सामनेही पाहता येणार आहेत. सध्या या वायफाय हॉटस्पॉटच्या चाचण्या सुरु असून ही सेवा प्रवाशांना जुलै महिन्यामध्ये उपलब्ध करुन देण्याचा मध्य रेल्वेचा विचार सुरु आहे.

प्रवाशांना ही सोय वापरण्यासाठी एक अॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करावे लागणार आहे. अनेक चित्रपट, गाणी, व्हिडीओ आणि इतर कनटेंट या अॅपमध्ये प्री लोडेड असणार आहे. म्हणजेच तो इंटरनेट नसतानाही पाहणे प्रवाशांना शक्य होणार आहे. अनेक भाषांमध्ये हे अॅप्लिकेशन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या यंत्रणेची चाचपणी सध्या कुर्ला स्थानकामध्ये सुरु असल्याची माहिती रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये वायफाय हॉटस्पॉट बसवण्यात येतील. मध्य रेल्वेवर ही संपूर्ण यंत्रणा बसवण्यासाठी चार महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment