या उमेदवाराच्या नावावर आहे सर्वाधिक निवडणुका हरण्याचा विक्रम

k-padamrajan
देशातील लोकसभा निवडणुकींना आता काहीच कालावधी उरला आहे. यात काही आजी-माजी तर नवखे उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. यातील काही खासदार तर असे ज्यांनी 4-5 वेळ खासदारकी भोगलेले उमेदवार देखील आहेत. पण आम्ही आज तुम्हाला एका अशा उमेदवाराबाबत सांगणार आहोत. ज्याने आतापर्यंत कोणत्याही निवडणुकीत विजय मिळवलेला नाही. सर्वाधिक वेळा निवडणूक हरण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. डॉ. के पद्मराजन असे तामिळनाडूतील या उमेदवाराचे नाव आहे. त्यांनी स्वतःच आपल्या नावापुढे ‘ऑल इंडिया इलेक्शन किंग’ असे विश्लेषण लावून घेतले आहे.

छंद असल्यासारखे डॉ.पद्मराजन हे निवडणुकीला उभे राहतात आणि त्यांचा दारुण पराभव होतो. त्यानंतर पुन्हा पुढच्या निवडणुकीची घोषणा झाली की कंबर कसून या लोकशाहीच्या यज्ञात उभे राहतात. 1988 पासून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. अनेक दिग्गजांविरोधात उभे राहून त्यांनी अपयश पत्करले आहे. ते आतापर्यंत 170 निवडणुका लढले आणि त्यातली एकही जिंकलेली नाही.

तामिळनाडूत सालेम जिल्ह्याचे रहिवासी असलेले पद्मनाभन होमिओपॅथी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांनी नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ते 1988 पासून निवडणुकांना उभे राहात आहेत. त्यांनी तेथील अनेक स्थानिक निवडणुका तर लढल्या आहेतच. पण केवळ स्थानिक निवडणूक लढवणारे ते उमेदवार नाहीत. अनेक राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना शह देण्याच्या इच्छेने त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्याचबरोबर अगदी पंतप्रधानपदी नाव घेतले जात आहे अशा उमेदवाराविरोधातही पद्मराजन उभे राहिल्याचा इतिहास आहे.

पद्मराजन यांनी अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, प्रणब मुखर्जी, ए पी जे अब्दुल कलाम, जयललिता, एम. करुणानिधी या बड्या नेत्यांविरोधात लढत दिली आहे. त्यांचा या नेत्यांपुढे टिकाव लागलेला नाही. ते स्वतःला ऑल इंडिया इलेक्शन किंग असे म्हणवून घेतात. आतापर्यंत पद्मराजन यांनी 28 लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. विशेष म्हणजे ते राष्ट्रपती पदाची निवडणूकही लढले आहेत. त्यांनी एकदा नव्हे तर 8 वेळा, 11 मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणुका लढवल्या आणि हरले.

Leave a Comment