संधी मिळाल्यास भारतात जबाबदारी स्वीकारणार रघुराम राजन

raghuram
शिकागो विद्यापिठात स्कूल ऑफ बिझिनेस मध्ये अर्थशास्त्र शिकवीत असलेले व भारताच्या रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी येत्या काळात भारतात चांगली संधी मिळाली तर जबादारी स्वीकारण्याची तयारी असल्याचे सूचित केले आहे. विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणूक निकालानंतर कॉंग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर रघुराम राजन यांना अर्थमंत्री केले जाईल अशी चर्चा सुरु असतानाचा राजन यांचे हे विधान आले आहे.

राजन यांच्या थर्ड पिलर या पुस्तकाचे मंगळवारी लाँचिंग झाले त्यावेळी बोलताना राजन यांनी हे संकेत दिले. आपण सार्वजनिक सेवा आणि राजकारण क्षेत्रात भूमिका बजावणार का या प्रश्नाला ते उत्तर देत होते. तसेच मंगळवारी एका टीव्हीला मुलाखत देताना ते म्हणाले सध्या मी जेथे आहे तेथे खुश आहे पण चांगली संधी असेल तर अन्य जबाबदारी स्वीकारण्याचा विचार करेन. भारताचे अर्थमंत्री झालात तर प्राथमिकता कशाला असेल या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, छोट्या मुदतीचे अनेक मुद्दे आहेत त्यावर फोकस केले तर सरकारचे अनेक महत्वाचे प्रोजेक्ट रुळावर येऊ शकतील.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी रघुराम राजन हे उत्तम अर्थतज्ञ आहेत असे विधान केले होते. राजन यांची रिझर्व बँक गवर्नर पदाची मुदत सप्टेंबर २०१६ मध्ये संपली होती पण ती वाढविली गेली नव्हती. मोदी सरकारवर व्याजदर वाढीबाबत राजन यांनी केलेली वक्तव्ये वाद निर्माण करणारी ठरली होती त्यामुळे वातावरण तणावाचे बनले होते.

Leave a Comment