डॉग वॉकर : किरकोळ पण चांगल्या उत्पन्नाचा व्यवसाय

dog-walker
या व्यवसायाचे नाव कदाचित कोणाला माहितही नसेल आणि नावावरून कल्पना केल्यास त्यांना आश्‍चर्य वाटेल असा हा व्यवसाय आहे. डॉग वॉकर म्हणजे लोकांची कुत्री सकाळी फिरायला नेण्याचा धंदा. हा आला कोठून? चेन्नईमध्ये एका तरुणाने हा व्यवसाय सुरू केला. तो अमेरिकेतून एम.बी.ए. होऊन शिकून आलेला होता आणि नोकरी करायची नाही अशी त्याची प्रतिज्ञा होती. त्याने वडिलांकडून दोन लाख रुपयांचे भांडवल घेऊन इतिहास काळातल्या दुर्मिळ वस्तू विकण्याचा व्यवसाय सुरू केला. अशा वस्तूंचा संग्रह करणारे लोक एखादी दुर्मिळ वस्तू मिळाली की, तिच्यावर जीव ओवाळून टाकतात आणि पाहिजे तेवढे पैसे देऊन ती विकत घेतात अशी त्याची कल्पना होती. म्हणून त्याने मोठी किंमत देऊन जुन्या वस्तू खरेदी केल्या. मात्र त्या वस्तू विकत घेणारे दर्दी लोक त्याला मिळालेच नाहीत. परिणामी धंदा तोट्यात आला. भांडवल बुडाले. आता काय करावे असा प्रश्‍न निर्माण झाला. या समस्येवर निमूटपणे नोकरीला जाणे हा उपाय होता, परंतु त्याला नोकरी करायची नव्हती. तो दुसरा काय व्यवसाय करता येईल याचा विचार करायला लागला आणि त्याला तो व्यवसाय सूचला.

एकेदिवशी तो पहाटेच मॉर्निंग वॉकला गेला असताना त्याला एक लठ्ठ श्रीमंत माणूस आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला बाहेर पडलेला दिसला. कुत्र्याची साखळी त्या मालकाने हातात घेतलेली होती आणि कुत्रा त्याला फरफटत घेऊन चालला होता. त्याची तारांबळ या मुलाने बघितली आणि त्याच्या डोक्यात एक नवा व्यवसाय जन्माला आला. त्याने त्या व्यापार्‍याला थांबवले आणि म्हणाला, ‘अंकल आपला कुत्रा फारच त्रास देतोय्, मी फिरून आणू का?’ त्या अंकलला कुत्रे पाळायची हौस होती, परंतु रोज सकाळी त्याला फिरवून आणण्याचीही कटकट नको होती. त्याला बरेच वाटले. त्याने या मुलाला विचारले, ‘रोज माझ्या कुत्र्याला पहाटे फिरवून आणण्याचे किती पैसे घेशील?’ त्याला पटकन् उत्तर देता आले नाही, पण थोडा विचार करून तो म्हणाला, ‘रोज एक तास कुत्र्याला फिरवून आणीन, महिन्याला तीन हजार रुपये द्या.’ व्यापार्‍याने ते कबूल केले. पण हा कल्पक उद्योजक त्या तीन हजारावर थांबणारा नव्हता. त्याने आपल्या घराच्या परिसरात अनेक घरांमध्ये जाऊन कुत्र्याची समस्या असणार्‍या लोकांच्या भेटी घेतल्या. त्याला ४० जणांनी कुत्रे फिरवून आणण्याचे काम दिले. लहान कुत्र्याला दोन हजार रुपये आणि मोठ्या कुत्र्याला तीन हजार रुपये दरमहा असा दर त्याला मिळाला.

या कल्पक तरुणाने आपल्या भागातल्या काही बेकार पोरांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना दरमहा एक हजार रुपये वेतनाच्या बोलीवर दररोज एक तास दोन कुत्रे फिरवून आणण्याची जबाबदारी दिली. दोन कुत्र्यांबद्दल त्याला पाच हजार रुपये मिळत होते आणि त्याच्या हाताखाली काम करणार्‍या माणसाला तो एक हजार रुपये देत होता. म्हणजे प्रत्येक कुत्र्यामागे एक ते दोन हजार रुपये त्याला मिळत होते. म्हणजे त्याची महिन्याला जवळपास ६० ते ८० हजार रुपये एवढी कमाई सुरू झाली होती. यासाठी त्याने उद्योजक प्रवृत्ती पणाला लावली होती. लोकांच्या घरोघर जाऊन, भेटी घेऊन कुत्री मिळवली होती आणि त्यासाठी आपले संभाषण कौशल्य पणाला लावले होते. शिवाय पैशांची वसुली आणि एक हजार रुपये वेतन घेणारी मुले कुत्रे फिरविण्याचे काम व्यवस्थित करतात की नाही हे बघण्यासाठी त्याचे व्यवस्थापन कौशल्य उपयोगाला आले होते आणि आपल्या या गुणसंपदेच्या जोरावर त्याने स्वत:चा एक व्यवसाय एकही पैसा न गुंतवता उभा करून दाखवला होता. तो एखाद्या कंपनीत नोकरीला लागला असता तर त्याला यापेक्षा वेगळे काय मिळणार होते?

Leave a Comment