जेआरडी टाटांची ५८ वर्षे जुनी मर्सेडिज आजही उत्तम स्थितीत

tata
देशातील सर्वात मोठे आणि दूरदृष्टीचे उद्योगपती म्हणून जेआरडी टाटा यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. भारताचे हवाई वाहतुकीचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारे, भारतातील पहिले विमान पायलट लायसन्स मिळविणारे, टाटा एम्पायरचे संस्थापक जेआरडी यांच्या आवडी त्यांच्या खानदानाला साजेश्या होत्या यात नवल नाही. १९६१ साली त्यांनी थेट जर्मनीतून मागविलेली, त्या जमान्यातील क्लासिक समजली जाणारी मर्सिडीज बेन्झ १९० डी आजही उत्तम स्थितीत जतन केली गेली असून सध्या तिची मालकी अशोक चांडक यांच्याकडे आहे.

ही कार जर्मनीतून १९६१ साली भारतात आली आणि सहा महिन्यांनी, १ जानेवारी १९६२ मध्ये तिची नोंदणी पुणे आरटीओ मध्ये केली गेली ती टेल्को नावाने. कारण खुद्द जेआरडी याचाच तो आग्रह होता. टाटा ग्रुप मधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कार २००८ साली अशोक चांडक यांना दिली गेली कारण चांडक यांना जुन्या कार्सची आवड होती आणि ही कार ते नीट सांभाळतील म्हणून त्यांना ती सोपविली गेली. चांडक यांनी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करून ही कार अतिशय उत्तम जतन केली आहे.

mersedese
मर्सिडीज १९० डी ही त्या काळातील सर्वात महाग आणि अलिशान कार्सपैकी एक होती. चांडक सांगतात आजही ही कार ताशी १२० किमी वेगाने धावते. कधी दुरुस्तीसाठी सुटे भाग लागले तर ते आजही जर्मनीतून मागविले जातात. व्हाईट ब्युटी असलेली ही कार आजही रस्त्यावर लोकांच्या नजरा आकर्षून घेते. या कारचे इंटिरियर बदलले गेलेले नाही. कारला हाईट अॅडजस्ट करता येणाऱ्या सीट आहेत आणि बायफोकल व्ह्यू मिरर आहेत. कारला ४ सिलिंडरचे १.८ लिटरचे एम १३६ इंजिन असून कारमध्ये असलेला एसी टेल्को कंपनीने बसविलेला आहे.

Leave a Comment