रशियन अनातोली मॉस्कविनच्या ‘प्राचीन बाहुल्यां’च्या संग्रहाचे नेमके काय होते रहस्य?

doll
अनातोली मॉस्कविनला इतिहासाची आवड होती. त्याला तेरा भाषा अवगत होत्या. आपली आवड जोपासण्यासाठी जगभ्रमंती केलेला अनातोली रशियाच्या निझ्नी नोवगोरोड शहराचा रहिवासी असून, तो पत्रकार होताच, आणि त्यासोबतच तो स्थानीक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना इतिहास शिकविण्याचे कामही करीत असे. अनातोलीला दफनभूमी आणि त्यांच्या इतिहासामध्ये विशेष रुची असून, त्याचा त्यामध्ये गाढा अभ्यास असल्याने ‘नेक्रोपोलिस्ट’ म्हणून त्याची ख्याती होती. त्याच्या या विषयाच्या अभ्यासामुळे, आणि या विषयावरील प्रभुत्वामुळे कॉलेजमधील इतर सहकाऱ्यांच्या मनामध्ये अनातोलीबद्दल आदराची भावना होती.
doll1
मात्र २०११ साली असे काही घडले, ज्यामुळे केवळ अनातोलीचा विद्यार्थीवर्ग, त्याचे सहकारी, पालक, यांनाच नाही, तर शहरातील सर्वच नागरिकांना चांगलाच धक्का बसला. अनातोलीच्या घरामधून तीन वर्षांपासून ते पंचवीस वर्षे वयोगटातील मुलींचे तब्बल २९ मृतदेह सापडले. या सर्व मृतदेहांचे ‘ममीफिकेशन’ केले गेले होते. या घटनेनंतर अर्थातच अनातोलीला अटक झाली व त्यानंतर सर्व कहाणी प्रकाशात आली. अनातोलीच्या मनामध्ये दफनभूमी आणि मृतदेहांमधील रुची, तो खूप लहान असतानाच निर्माण झाली असल्याचे अनातोलीने म्हटले आहे. पण त्याची ही रुची इतके विकृत रूप घेईल अशी कल्पना मात्र कोणीही करू शकलेले नव्हते.
doll2
दफनभूमींमधून भटकण्याची सवय अनातोलीला लहानपणापासूनच होती. दफनविधी, त्यांचा इतिहास, त्यांच्याशी निगडीत अनेक परंपरा यांमध्ये अनातोलीला इतकी जास्त रुची निर्माण झाली, की केवळ रशियन परंपराच नाही, तर इतर देशांतील दफनविधींचा इतिहास, परंपरा समजून घेता याव्यात या करीता अनातोलीने तेरा भाषा शिकून आपला अभ्यास सुरु ठेवला. या विषयामध्ये त्याचा व्यासंग एवढा होता, की त्याचे अनेक अभ्यासपर लेख वृत्तपत्रांमध्ये, जर्नल्समध्ये छापून येऊ लागले होते.
doll3
२००९ साली शहरातील काही लोकांना काही दफनभूमींमधील समाधी खणून काढल्या असल्याचे आढळून येऊ लागले. या घटना जेव्हा वारंवार घडू लागल्या, तेव्ह हे काम नक्की कोणाचे असावे याबद्दल अनेक तर्कवितर्कही सुरु झाले. काहींच्या मते हे काम काही अतिवादी संघटनांचे होते, तर काहींच्या मते हे काम गुन्हेगारी टोळ्यांचे असल्याचे अंदाज व्यक्त केले जाऊ लागले. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पोलिसांची गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला. पण तरीही समाधी खणून त्यातील मृतदेह गायब होण्याचा प्रकार सुरूच राहिला. या बाबतीत तपास करीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या किंवा इतर नागरिकांच्या हाती कसलीही माहिती लागू शकली नाही.
doll4
या सर्व रहस्यावर प्रकाश टाकणारा पहिला पुरावा पोलिसांच्या हाती लागला २०११ साली. शहरातील एका दफनभूमीमध्ये काही समाधीस्थळांच्या आसपास गूढरित्या कोणीतरी वावरत असल्याची बातमी पोलिसांना मिळताच पोलीस दफनभूमीमध्ये पोहोचले आणि त्यांनी संशयावरून अनातोलीला अटक केली. अनातोलीची चौकशी करण्याच्या उद्देशाने आणि त्याचा या घटनांशी काही संबंध आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी जेव्हा पोलिसांनी अनातोलीच्या घराची झडती घेतली, तेव्हा त्यांना जे सापडले ते निव्वळ हादरवून टाकणारे होते. अनातोली आपल्या लहानशा अपार्टमेंटमध्ये आपल्या आई-वडिलांसमवेत रहात होता. या अपार्टमेंटमध्ये ठिकठिकाणी ‘लाईफ साईझ’, म्हणजेच मानवी आकारच्या ‘बाहुल्या’ही ठेवलेल्या होत्या. प्रथमदर्शनी या सर्व बाहुल्यांचा हा एक प्राचीन संग्रह असावा असे भासत होते. प्रत्येक बाहुलीला निरनिरळ्या प्रकारची वेशभूषा परिधान करविली गेली असून, काहींचे चेहरे कापडाने झाकलेले असून त्यावर मेकअपही केलेला होता. काहींचे हात कपड्यांत गुंडाळलेले होते. या ‘बाहुल्यांचे’ जवळून निरीक्षण करताच या मुळात बाहुल्या नसून ‘ममीफिकेशन’ केलेले मृतदेह असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
doll5
या सर्व ममींच्या व्यतिरिक्त हे मृतदेह ज्या कबरींमधून बाहेर काढले गेले होते त्या कबरींची छाया चित्रे, ममी कशा प्रकारे तयार केली जावी याची माहिती देणारी अनेक पुस्तके, दफनभूमीचे नकाशे इत्यादी अनेक पुरावे पोलिसांना अनातोलीच्या घरामध्ये सापडले. मृत व्यक्तींना परत जिवंत कसे करता येऊ शकेल याचा शोध घेण्यासाठी आपण हे कृत्य केले असल्याचे अनातोलीचे म्हणणे होते. तसेच आपल्या घरामध्ये असणाऱ्या या ‘बाहुल्या’ बनविण्याची आवड आपल्या मुलाला असावी असे समजून, या बाहुल्या वास्तविक ‘ममीफिकेशन’ केलेले खरेखुरे मृतदेह असल्याची कोणतीच कल्पना आपल्याला नसल्याचे अनातोलीच्या आई-वडिलांचे म्हणणे होते.
doll6
अनातोलीचे हे कृत्य उघडकीस आल्यावर त्याला मानसोपचार तज्ञांकडे पाठविले असता, त्याला स्किझोफ्रेनिया असल्याचे निदान करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. आता अनातोलीने पन्नाशी ओलांडली असून त्याच्यावर अद्यापही उपचार सुरु आहेत. पण आता परिस्थिती खूपच बदलली आहे. एकेकाळी अनातोलीबद्दल अतिशय आदर असणाऱ्या त्याच्या विद्यार्थ्यांनी किंवा सहकाऱ्यांनी त्याच्याशी कोणताही संबंध ठेवलेला नाही. अनातोलीचे पालक ही आता एकाकी जीवन जगत आहेत.

Leave a Comment