हॉस्पिटलमधील प्रसूती विभागात ९ नर्स एकाचवेळी प्रेग्नंट

nurses
युएसएच्या पोर्टलंड मधील मॅने हॉस्पिटलमध्ये एक अजब घटना घडली असून हॉस्पिटल प्रशासनाने त्याबाबत आनंद व्यक्त केला आहे. या हॉस्पिटलच्या प्रसूती विभागात काम करणाऱ्या नर्स पैकी ९ जणी एकाचवेळी प्रेग्नंट असून एप्रिल ते जुलै या काळात त्या बाळांना जन्म देणार आहेत. या हॉस्पिटलनेच ही घोषणा केली असून फेसबुकवर या नर्स ब्रिगेडचे फोटो शेअर केले आहेत. बोनान्झा ऑफ बेबिज या नावाने ही पोस्ट केली गेली आहे.

फोटोमध्ये नऊ जणींपैकी आठ जणी दिसत असून त्या हॉस्पिटल गणवेशात आहेत आणि त्यांच्या हातात असलेल्या कार्डवर त्यांची डिलिव्हरी डेट लिहिली गेली आहे. या नर्स सांगतात आम्ही इतक्याजणी एकदम प्रेग्नंट आहोत पण त्यामुळे आमचे नाते अधिक घट्ट बनले आहे. आम्ही एकमेकींची काळजी घेत आहोत आणि आम्ही सर्वजणी खूप आनंदात आहोत.

विशेष म्हणजे हॉस्पिटल सुद्धा या नर्सची विशेष काळजी घेत असून त्यांचा आहार, व्यायाम योग्य प्रकारे होत आहे ना तसेच शिफ्ट मध्ये काम करताना त्यांना काही अडचण नाही ना हे आवर्जून लक्षात घेत आहे. जेव्हा या सर्वजणी प्रसूती रजेवर जातील तेव्हा त्यांच्या जागी दुसऱ्या नर्स तैनात करण्याची तयारी हॉस्पिटलने केली आहे. या प्रेग्नंट नर्स हॉस्पिटलच्या नोंदणीकृत परिचारिका आहेत आणि त्या सर्व जणींच्या घरी पाळणा हलणार म्हणून हॉस्पिटल प्रशासन खुश आहे.

Leave a Comment