ब्रिटनच्या लिव्हरपूल मध्ये धावणार रिक्षा

rikshaw
भारत आणि अन्य आशियाई देशात जागोजागी दिसणाऱ्या रिक्षा आता ब्रिटनमध्येही धावणार आहेत. ब्रिटनच्या लिव्हरपूल मध्ये ओलाने हि सेवा सुरु केली असून बजाज व पिअजीनोच्या रिक्षा त्यासाठी वापरल्या जाणार आहेत. ही रिक्षा सेवा अॅप आधारित आहे.

युके मध्ये रिक्षा सेवा सुरु होणार या बातमीवर अनेकांनी त्यांची मजेशीर मते व्यक्त केली आहेत. ब्रिटन मधील रिक्षाचालक भारतीय रिक्षाचालकांकडून धडे घेणार का या प्रश्नाबरोबर रिक्षा प्रवाशांनी काय काळजी घ्यावी याचे सल्लेही दिले जात आहेत. रिक्षाचालक कुठेही गेले तरी त्यांच्या वागणुकीत बदल संभवनीय नाही असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे लिव्हरपूल वासियांनी रिक्षाप्रवास करताना खालील प्रमाणे दक्षता घ्यावी अश्या सूचना दिल्या जात आहेत.

liverpool
भारतीय रिक्षावाल्यांचा अनुभव घेतलेल्या प्रवाशांच्या मते लिव्हरपूलवासियानी रिक्षा सेवा घेताना लोकेशन सांगू नये अशी महत्वाची सूचना दिली गेली आहे. अन्यथा जवळचे ठिकाण असेल तर ते राईड कॅन्सल करतील. स्वतःचे नेव्हिगेशन अॅप वापरून रिक्षावाल्याला आम्हालाही रस्ता माहिती आहे असे भासवा अन्यथा रिक्षावाला लांबच्या रस्त्याने नेईल. रिक्षा प्रवासात क्लासिक इंग्लिश गाणी ऐकण्याची तयारी ठेवा. तुम्हाला गाणी हवीत कि नको याचा सवाल नाही, तर रिक्षावाला त्या तालावर सिगरेट धूर सोडणे, पान मसाला खाऊन पिंक मारणे असे उद्योग करतो त्यामुळे हि गाणी आवश्यक असतात.

बेफिकीरपणे, अन्य रहदारीची तमा न बाळगता रिक्षा विमानासारखी पळविणे हा रिक्षाचालकांचा आत्मसन्मानाचा भाग असतो त्यामुळे चुकूनही रिक्षा हळू न्या असे सांगायच्या भरीला पडू नये असाही सल्ला दिला गेला आहेच पण त्याचबरोबर सगळेच रिक्षावाले असे नसतात त्यामुळे तुमचे भाग्य थोर असेल तर तुम्हाला चांगला रिक्षावाला भेटू शकतो असा दिलासाही दिला गेला आहे.

Leave a Comment