जिंकणार कोण – भाजप की आयपीएल?

election
देशाच्या राजकारणात सध्या भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये लढत होत आहे. मात्र आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यापेक्षाही आणखी एका प्रतिस्पर्ध्याशी भाजपला दोन हात करावे लागणार आहेत. त्या लढतीत विजय मिळाला तरच निवडणुकीत काही यश मिळण्याची आशा भाजपला आहे. तो प्रतिस्पर्धी म्हणजे इंडियन प्रीमियर लीग उर्फ आयपीएल!

देशातील घराघरात असलेल्या टीव्हींच्या पडद्यावर सध्या हा जबरदस्त संघर्ष पाहायला मिळत आहे. क्रिकेट आणि राजकारण समोरासमोर आले आहेत. या संघर्षात सर्वाधिक नुकसान भाजपला होण्याची शक्यता आहे, कारण बहुतेक वाहिन्यांवर भाजपच्या प्रचाराच्या जाहिराती चालू आहेत. आयपीएलमुळे मोठ्या संख्येतील प्रेक्षक त्या वाहिन्यांवरून दुसरीकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थातच भाजपच्या जाहिराती पाहणार कोण? म्हणजेच खेळ विरुद्ध राजकारणाचा हा सामना रंगला आहे.

तसे या दोन्ही स्पर्धकांमध्ये थोडेसे साम्यही आहे. आयपीएलसाठी खेळाडूंचा ज्या प्रमाणे लिलाव होतो त्याच प्रमाणे भाजपमध्ये काँग्रेसमधून आयते उमेदवार आणण्याचा राष्ट्रव्यापी उपक्रम सुरू आहे. दोन्ही ठिकाणी अनिश्चिततेचा खेळ आहे. शिवाय भारतीय लोकांमध्ये या दोन्ही गोष्टींचे वेड समान प्रमाणात आहे. मात्र राजकारण आणि क्रिकेट जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा राजकारण्यांपेक्षा क्रिकेटपटूंचे पारडे जड ठरते. नेत्यांपेक्षा स्पोर्ट्सस्टारना पाहण्यात लोकांना जास्त रस असतो, हे आतापर्यंत दिसून आले आहे. म्हणूनच आणखी दोन महिन्यांनी 12 मे रोजी या हंगामातील अंतिम सामना खेळला जाईल तोपर्यंत देशातील प्रेक्षकांपैकी कोट्यवधींचा एक वर्ग टीव्हीच्या पडद्यावर फक्त क्रिकेट सामने पाहणार आहे.

आयपीएलचे हे बारावे वर्ष आहे. मात्र भारतीय भूमीवर निवडणुका आणि आयपीएलचे सामने एकत्र होण्याची ही पहिलीच वेळ आहे. असा योगायोग यापूर्वी 2009 मध्ये आला होता, मात्र तेव्हा मुंबईतील26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या होत्या. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा कोणताही धोका पत्करण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून सरकारने आयपीएलला परवानगी नाकारली होती. अखेर ती आयपीएलची स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत झाली होती. मागील लोकसभा निवडणुकीतही असा योगायोग येता येता राहिला होता कारण तेव्हा आयपीएल स्पर्धा भारत आणि संयुक्त अरब अमीरातीने (युएई) संयुक्तरीत्या आयोजित केली होती. त्यातील आरंभीचे 20 सामने युएईत खेळण्यात आले होते आणि निवडणुका व क्रिकेट सामन्यांमध्ये थेट संघर्ष टळला होता. मात्र यंदाच्या हंगामात या स्पर्धेतील सर्व सामने भारतात खेळण्यात येत आहेत.

निवडणूक प्रचार आणि जनसंपर्काचे काम मुख्यतः दुपारचे ऊन कमी झाल्यानंतर केले जाते. आयपीएलचे सामने नेमके याच वेळेस असतात. त्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांचे मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार करण्याची प्रक्रिया यामुळे बाधित होण्याचीही शक्यता आहे. कित्येक ठिकाणी मतदानाची टक्केवारीही खाली येण्याची शक्यता आहे. देशात अनेक ठिकाणी आताच पारा वर चढला असून येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. सध्या वृत्त वाहिन्यांपासून मनोरंजन वाहिन्यांपर्यंत सर्व वाहिन्यांवर भाजपच्या जाहिरातींचा रतीब सुरू आहे. त्या जाहिराती कोण पाहणार असा प्रश्नही यामुळे उपस्थित होऊ शकतो.

म्हणूनच भारतीय क्रिकेट चाहत्यांना प्रथमच क्रीडा वाहिन्यांवर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेससारख्या पक्षांच्या राजकीय जाहिराती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलचे मुख्य ब्रॉडकास्टर्स स्टार वाहिनीकडून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) या संदर्भात विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना आयपीएलच्या प्रसारणादरम्यान राजकीय जाहिराती दाखवायच्या आहेत. बीसीसीआयने आजवर कधीही क्रिकेट आणि राजकारण एकत्र केलेले नाही, त्यामुळे मंडळाकडून याबाबत सावधगिरीने पावले उचलण्यात येत आहेत. बीसीसीआय आणि स्टार नेटवर्कमध्ये 2018 ते 2022 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी झालेल्या करारानुसार सामन्यांच्या प्रसारणादरम्यान कोणत्याही राजकीय आणि/ किंवा धार्मिक जाहिरातींना परवानगी नाही. ही एक सर्वात मोठी अडचण राजकीय पक्षांच्या दृष्टीने आहे.

क्रिकेट हा भारतीयांचा सर्वात मोठा धर्म असल्याचे सांगितले जाते. मात्र तेच भारतीय राजकारणातही आकंठ बुडालेले असतात. विशेषतः यंदाच्या निवडणुका ‘मोदीसमर्थक विरुद्ध मोदीविरोधी’ अशा प्रकारे रंगवल्या जात आहेत. मतदारांमध्ये ध्रुवीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वेळेस, 2014 मध्ये, मोदी लाट होती मात्र यंदाच्या निवडणुकीत कोणतीही लाट नाही. मात्र सार्वजनिक ठिकाणी चर्चांना भर आला आहे. एकंदर परिस्थिती पाहता क्रिकेटचे वेड राजकारणाला भारी पडणार का पक्षनिष्ठा क्रिकेटवर मात करणार, हे पाहणे चुरशीचे ठरणार आहे.

Leave a Comment