अतिसुंदर पण मालकांसाठी शाप बनलेले गेओला आयलंड


इटलीचा समुद्र तसाही खूपच सुंदर. या समुद्रात अनेक बेटेही आहेत. अतिश्रीमंत व्यक्ती जमिनी, डोंगर अशी खरेदी करतात पण त्याहूनही श्रीमंत व्यक्ती समुद्रातली सुंदर बेटेच खरेदी करत असतात असे दिसून येते. समुद्रातील अशा एकांत देणार्‍या बेटांवर अशा कुबेरांच्या हवेल्या, अन्य सोयीसुविधा बांधल्या जातात व आम जनतेसाठी अशी बेटे म्हणजे स्वर्गीय ठिकाणे भासतात. जगात अशी अनेक श्रीमंतांच्या मालकीची बेटे आहेत. पण इटलीतील गेओला बेट निराळ्याच कारणाने प्रसिद्धीस आले आहे.

जगातील अतिसुंदर बेटांच्या यादीत वरच्या स्थानावर असलेले हे बेट मालकासाठी कायम अपशकुनी ठरले आहे. कुणीही पाहताच प्रेमात पडावे असे हे बेट पर्यटकांचे आवडते स्थळ आहे मात्र येथे जाणारे पर्यटक रात्र होण्याच्या आत तेथून परत फिरतात. हे बेट अनेक वेळा विकले गेले आहे मात्र ज्यांनी कुणी ते खरेदी केले त्यांच्यावर अनंत संकटे आली, कांहीना मृत्यूही आला आहे. या बेटाबाबत अनेक कथा सांगितल्या जातात.


हे बेट ज्यांनी खरेदी केले त्यातील कांही जणांना तडकाफडकी मृत्यू आला, कांहीचा व्यवसाय बुडाला तर कांहीचे अतोनात नुकसान झाले.१९२० साली स्विस ओनर हॅन्स ब्राऊन याने हे बेट खरेदी केले व त्यानंतर त्याचा अचानक मृत्यू झाला. जर्मनीच्या ग्रून बॅक यांनी ते खरेदी केले तेव्हा त्यांनाही हार्टअॅटॅक येऊन त्यांचा जीव गेला. त्यानंतर एका उद्योगपतीने ते खरेदी केले पण नंतर त्याने आत्महत्या केली. पॉल गेटी या अब्जाधीशाने ते खरेदी केले तेव्हा त्याच्या नातवाचे अपहरण केले गेले. या बेटाचा शेवटचा मालक विमा अफरातफरी प्रकणात तुरूंगात गेला. त्यामुळे हे बेट शापित म्हणून प्रसिदधीस आले आहे.

Leave a Comment