या मुळे बिघडते सासू सुनेचे नाते

sasu
सासू सून हे नाते अति नाजूक आणि अति संवेदनशील मानले जाते. यात थोडीशी चूक खूप महागात पडू शकते. सर्वसाधारण लग्नाच्या वेळी सुनेचे भरभरून कौतुक करणारी सासू आणि आई किती चांगल्या याचा डंका पिटणारी सून थोड्याच काळात एकमेकीच्या उखाळ्यापाखाळ्या काढतात असे अनेकदा दिसते. मग त्या सासू सुना कोणत्याची आर्थिक स्तरातील असोत. अगदी सेलेब्रिटीसुद्धा त्याला अपवाद नाहीत असे म्हणता येते. पण सून घरात येऊन बराच काळ होऊनही सासू सुनेचे नाते खूपच जिव्हाळ्याचे असल्याची उदाहरणे आहेत पण ती हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच.

suun
असे म्हणतात की सासू सुनेचे नाते बिघडण्यामागे काही पारंपारिक गैरसमज कारणीभूत असतात. मुळात हे नाते सांभाळणे ही दोघींची जबाबदारी आहे. मुली विवाहापूर्वीच सासू सून म्हणजे वाद आणि भांडणे होणार असे गृहीत धरतात तर लग्नानंतर मुलगा बदलला असे बहुतेक सासवांना वाटते आणि येथेच दुहीची बीजे पेरली जातात. पण दोघींनीही स्वतःच्या कोणत्या सवयी भांडणाला कारणीभूत होतात हे जाणून त्या बदलल्या तर हे नाते खरोखर पक्व होऊ शकते.

आजकाल ८० टक्के सुना नोकरी करणाऱ्या असतात. कामाचे तास अधिक असतील तर त्या घरकाम करण्यास उत्सुक नसतात. अश्यावेळी घरात नणंद, जाऊ घरकाम करत असतील आणि नवी सून करत नसेल तर सासूबाई त्यावरून टोमणे मारतात. पण वेळ नाही या सबबीखाली सुना घरकाम टाळू पाहतात आणि नाराजी पसरते.

shloka
नोकरी करणाऱ्या मुली कार्यालयात स्वतःची सासू आणि मैत्रिणीची सासू यांच्यात उगीच तुलना करतात आणि आपल्या सासूला आपले कौतुक नाही असा समज करून घेतात. घरात चीडचीड करू लागतात. या उलट सासू पण दुसऱ्या घरातील सुनांबरोबर आपल्या सुनेची तुलना करून दुसऱ्याच्या सुना अधिक गुणी असल्याचा समज करून घेतात आणि मग अरे ला कारे सुरु होते.

यात घरोघरी मातीच्याच चुली ही म्हण नेहमी लक्षात ठेवली तर भांडणाचे अनेक विषय संपू शकतात. प्रत्येक घराची गोष्ट वेगळी असते आणि होणारे वाद कमी करण्यासाठी आड वळणाने बोलण्यापेक्षा थेट संवाद अधिक उपयुक्त ठरतो. समज गैरसमज समोरसमोर बोलून दूर होऊ शकतात हे लक्षात ठेवले तर हे नाते अधिक सुदृढ बनू शकते आणि सून सासूची शक्ती तर सासू सुनेचा भक्कम आधार बनू शकतात.

Leave a Comment